जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील कासमवाडी परिसरामध्ये आमच्या दुकानावर येणारे ग्राहक तुम्ही वळविल्याचे म्हणत नवीद अकिल खाटीक यांच्या डोक्यात एक किलोचे माप शेजारील दुकानदाराने मारल्याची घटना शनिवारी १० मे रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवीद खाटीक यांचे कासमवाडी परिसरात दुकान आहे. त्यांच्या शेजारील दुकानदार त्यांच्याकडे आला व तुम्ही आमचे ग्राहक तुमच्याकडे वळविले आहे. तुम्हाला जास्त झाली आहे, असे म्हणत एक किलो वजनाचे माप डोक्यात मारले. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. तसेच तेथे आणखी एक जण आला व त्याने नवीद व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली.
या प्रकरणी खाटीक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजीव मोरे करीत आहेत.