
चाळीसगावलाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील दोन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये झालेल्या चोऱ्यांच्या घटनांचा चाळीसगाव शहर पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत यशस्वी उलगडा केला आहे । याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला (विधीसंघर्षित बालक) ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ५६,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे । मंदिरांना केले होते लक्ष्यशहरात गेल्या काही दिवसांत दोन मंदिरे टार्गेट करण्यात आली होती.

जयशंकर नगर मंदीर: दिनांक २६ मे ते २७ मे २०२६ दरम्यान जयशंकर नगर परिसरातील एका मंदिराच्या दानपेटीतून सुमारे १५,०००/- रुपये रोख रक्कम चोरीला गेली होती. व दत्तवाडी दत्त मंदीर: दिनांक ४ जून २०२६ रोजी दत्तवाडी परिसरातील दत्त मंदिरातून देवाचा चांदीचा मुकुट आणि चांदीचा त्रिशूळ (अंदाजे किंमत ४४,४००/- रुपये) चोरीला गेल्याची घटना घडली होती.
या दोन्ही घटनांबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाला यशमंदिरात झालेल्या चोऱ्यांमुळे भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. घटनेचे गांभीर्य ओळखून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी आपली गोपनीय यंत्रणा आणि बातमीदार सक्रिय केले. दिनांक ८ जून २०२६ रोजी मिळालेल्या अचूक गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एका संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. तांत्रिक विश्लेषण आणि पोलिसी खाक्या दाखवताच या मुलाने दोन्ही मंदिरांमधील चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेली ७,१०० रुपये रोकड, चांदीचा मुकुट आणि चांदीचा त्रिशूळ असा एकूण ५६,५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
तपास पथकाचे कौतुकही धडक कामगिरी
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी अमितकुमार मनेळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या यशस्वी कारवाईत पोलीस अंमलदार प्रशांत तुकाराम पाटील, योगेश रमेश मांडोळे, मोहन बाबूराव सुर्यवंशी, पवन कृष्णा पाटील, विलास धर्मा पवार आणि दिलीप शिवाजी राक्षे यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली. पोलिसांच्या या तत्पर कामगिरीचे शहरात कौतुक होत आहे.



