शिक्षक भिका जावरे यांचा ‘समाज भूषण’ पुरस्काराने गौरव

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलणारे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा घोडसगाव (ता. मुक्ताईनगर) येथील शिक्षक भिका प्रल्हाद जावरे यांना ‘समाज भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाने याआधीच त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य शिक्षक पुरस्कार प्रदान केला होता. शिवाय त्यांना सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अभ्यास दौऱ्यातही सहभागी करून घेतले गेले होते. त्यांच्या कार्यामुळे स्थानिक व प्रदेश पातळीवर एक सकारात्मक आदर्श निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर श्री. संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्रतर्फे आयोजित तेली समाजाच्या प्रथम राज्यस्तरीय अधिवेशनात त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमात माजी आमदार आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णाजी खोपडे (पूर्व नागपूर) यांच्या हस्ते श्री. जावरे यांना शाल, श्रीफळ, संताजी महाराजांची मूर्ती, सन्मानचिन्ह आणि ‘समाज भूषण’ पुरस्कार प्रदान करून सपत्नीक गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन शेगाव येथील अग्रेसर भवनात करण्यात आले होते.

या प्रसंगी देशभरातून आलेल्या अनेक मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमात लाभली. नेपाळ येथून आलेले साहू तेली समाजाचे अध्यक्ष सत्यनारायण साहा, दिल्लीतील समाजसेवक रणजीत गुप्ता, नागपूरचे माजी खासदार सुरेश वाघमारे, प्रदेश तेली महासंघाचे अध्यक्ष विजय चौधरी, राष्ट्रीय अध्यक्ष उमेश साहू यांच्यासह महाराष्ट्रातील तेली समाजाचे विविध नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संताजी नवयुवक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष घाटे, कार्यकारी अध्यक्ष मंगेश सातपुते, संघटन सचिव मुकुंद खेडकर, प्रमोद वरुडकर यांनी कार्यक्रमाचे उत्तम आयोजन केले.