युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएलचे सामने !

मुंबई प्रतिनिधी । १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार असल्याची माहिती गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे.

पटेल यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार संयुक्त अरब अमिरात अर्थात युएईमध्ये १९ सप्टेंबरला स्पर्धेला सुरुवात होणार असून ८ नोव्हेंबर ला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. अलीकडेच आयसीसीने ऑस्ट्रेलियात प्रस्तावित टी-२० विश्‍वचषकाचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकललं आहे. यानंतर बीसीसीआयकडून आयपीएलची घोषणा करण्यात आली आहे.

याआधी २६ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार असा अंदाज बांधला जात होता. परंतु युएईवरुन भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलिया दौर्‍याला रवाना होईल. या दौर्‍याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक संघाला सरावासाठी किमान एका महिन्याची गरज असल्यामुळे २० ऑगस्ट रोजी संघ युएईसाठी रवाना होणार असून लागलीच सराव सुरू करणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली आहे.

Protected Content