
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत मुक्ताईनगर येथील जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी प्रियंका विलास जाधव हिने गोळाफेक या क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे प्रियंकाची नाशिक विभागीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली असून, तिच्या कामगिरीमुळे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात शालेय १७ वर्षांखालील मुलींच्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत मुक्ताईनगरच्या जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत शिक्षण घेणाऱ्या प्रियंका जाधव हिने गोळाफेक प्रकारात सहभाग घेत उत्कृष्ट क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले. प्रतिस्पर्धी खेळाडूंना मागे टाकत तिने प्रथम क्रमांक मिळवला आणि जिल्हास्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली.
प्रियंकाने मिळवलेल्या या यशामुळे जे. ई. स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या नावलौकिकात भर पडली आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून तिने नाशिक विभागीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळवला आहे. आता विभागीय स्तरावरील स्पर्धेतही उत्कृष्ट कामगिरी करून विद्यालयाचे नाव उज्ज्वल करण्याची संधी तिच्यासमोर आहे. प्रियंकाच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, उपाध्यक्ष नारायण चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी, संस्थेचे सदस्य पुरुषोत्तम महाजन आणि महेश पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. तिच्या मेहनतीचे आणि क्रीडाक्षेत्रातील कामगिरीचे कौतुक करत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपमुख्याध्यापिका वंदना शिर्के, पर्यवेक्षक विलास बर्हाटे, कैलास कवळे, संजीव वाढे तसेच तालुका क्रीडा अधिकारी नितीन जंगम यांनीही प्रियंकाचे कौतुक केले. नाशिक विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाल्याबद्दल समाधान व्यक्त करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रियंकाला क्रीडा शिक्षक एस. एम. वाढे, एम. आर. चौधरी, एस. जे. मोरे आणि एस. एन. भोळे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनासह प्रियंकाने केलेल्या मेहनतीमुळे तिला जिल्हास्तरावर हे यश मिळवता आले. तिच्या यशाबद्दल विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.



