Home Cities रावेर बुद्धिमत्ता असून चालत नाही ; सातत्य, चिकाटी आणि सकारात्मक विचार आवश्यक :...

बुद्धिमत्ता असून चालत नाही ; सातत्य, चिकाटी आणि सकारात्मक विचार आवश्यक : बबनराव काकडे

0
15


रावेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । केवळ बुद्धिमत्ता असून जीवनात यश मिळत नाही, तर त्यासाठी सातत्य, चिकाटी, सकारात्मक विचार आणि अपयशातून शिकण्याची वृत्ती आवश्यक असते. अपयशाने खचून न जाता ध्येय निश्चित करून सातत्याने प्रयत्न करत राहिले पाहिजेत. स्पर्धा परीक्षा केवळ क्लास करून किंवा नोकरी सोडूनच देता येतात, हा गैरसमज असून इच्छाशक्ती आणि योग्य नियोजनाच्या जोरावर कोणत्याही परिस्थितीत यश संपादन करता येते, असे प्रतिपादन फैजपूरचे उपविभागीय अधिकारी बबनराव काकडे यांनी केले.

रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. काकडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अरुण पाटील होते. कार्यक्रमास मुंबईचे आयआरएस संजय रामदास महाजन, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, आरएफओ श्रीकांत काळे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक मंडळाचे माजी अध्यक्ष जे. के. पाटील, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब वाळके, प्रा. डॉ. पी. टी. चौधरी, गटशिक्षणाधिकारी रवींद्र बखाल, मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित, डॉ. सुरेश पाटील, डॉ. एस. आर. पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित यांनी केले.

बबनराव काकडे यांनी विद्यार्थ्यांना जिज्ञासू वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. अवांतर वाचनाला जीवनात विशेष महत्त्व असून, चांगली पुस्तके आणि वर्तमानपत्रांचे नियमित वाचन केल्याने ज्ञानाचा विस्तार होतो. वाचनामुळे व्यक्तिमत्त्व समृद्ध होते. यशासाठी सातत्याने प्रयत्न करण्यासोबतच सकारात्मक विचारसरणी ठेवणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी राग, मत्सर आणि द्वेष मनात न ठेवता सकारात्मक विचारांनी पुढे जावे. जीवनातील अडचणींकडे संकट म्हणून न पाहता त्यातून संधी शोधल्यास प्रगतीचा मार्ग अधिक सुकर होतो, असेही त्यांनी नमूद केले. मालमत्तेवरून निर्माण होणारे अनेक वाद हे प्रत्यक्षात हेवेदावे आणि अहंकारातून निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबात आणि समाजात प्रेम, सहकार्य व सकारात्मकता वाढविणे गरजेचे असल्याचा संदेशही त्यांनी दिला.

अध्यक्षीय भाषणात माजी आमदार अरुण पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या यशामागे त्याग, संयम आणि कष्ट यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मानसिकता स्थिर ठेवून आपले ध्येय निश्चित करावे आणि ते साध्य करण्यासाठी सातत्याने मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. पालकांनी मुला-मुलींवर केवळ मोठे शिक्षण घेण्याचा आग्रह न धरता त्यांच्या क्षमता, आवड आणि कौशल्य ओळखून त्यांना योग्य क्षेत्राची निवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी असते. त्या क्षमतेला योग्य दिशा देणे ही पालकांसोबतच समाजाचीही जबाबदारी आहे, असे अरुण पाटील यांनी नमूद केले. यावेळी विविध शैक्षणिक परीक्षा, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच समाजासाठी योगदान देणाऱ्या देणगीदारांच्या छायाचित्रांचे अनावरणही करण्यात आले.

यावेळी मूळचे निभोरा येथील आणि सध्या मुंबईत वास्तव्यास असलेले आयआरएस अधिकारी संजय महाजन (वानखेडे) यांनी रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाच्या प्रगतीसाठी तब्बल ११ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. समाजाच्या शैक्षणिक व विकासात्मक उपक्रमांना बळ देणाऱ्या या योगदानाबद्दल रावेर तालुका मराठा समाज मंडळ आणि समाजबांधवांच्या वतीने संजय महाजन यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. बी. महाजन आणि शेखर पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी माजी आमदार अरुण पाटील यांच्या वतीने अस्सल खान्देशी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. आभार वामनराव पाटील आणि दिलीप पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला मराठा समाज विकास मंडळाचे पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound