
अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरात पोलिसांनी सोमवारी (२४ ऑगस्ट) रूट मार्च काढून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सज्जता दर्शविली. सकाळी १० ते ११.२० वाजेच्या दरम्यान शहरातील संवेदनशील भागातून हा रूट मार्च काढण्यात आला. पोलीस अधिकारी आणि मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाल्याने शहरातील प्रमुख भागांमध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि अमळनेर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च घेण्यात आला. आगामी ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे तसेच कोणत्याही अनुचित प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ही खबरदारी घेण्यात आली. रूट मार्चदरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पाच कंदील चौक, दगडी दरवाजा, सराफ बाजार, पानखिडकी, वाडी चौक, कसाली डीपी, आखाडा मकान, झामी चौक, पवन चौक, तिरंगा चौक आणि गांधलीपुरा चौकी या शहरातील संवेदनशील व महत्त्वाच्या भागातून पोलिसांचे संचलन करण्यात आले.
या रूट मार्चसाठी अमळनेर पोलीस ठाण्याकडून ६ अधिकारी आणि ४८ अंमलदार सहभागी झाले होते. मारवड पोलीस ठाण्याकडून २ अधिकारी व १५ अंमलदार, एरंडोल पोलीस ठाण्याकडून १ अधिकारी व १० अंमलदार, तर धरणगाव पोलीस ठाण्याकडून १ अधिकारी व ३ अंमलदार सहभागी झाले. याशिवाय चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याकडून ३ अंमलदार, चोपडा शहर पोलीस ठाण्याकडून ३ अंमलदार तसेच पोलीस मुख्यालयाकडील दंगा नियंत्रण पथकातील ३ कर्मचारी आणि एक क्यूआरटी पथकही रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते. एकूण ११ अधिकारी आणि १२५ अंमलदारांच्या सहभागामुळे शहरातील पोलिसांची व्यापक तयारी यावेळी दिसून आली.
रूट मार्चमध्ये पोलीस मुख्यालय, जळगावकडील बँड पथकाचीही उपस्थिती होती. संवेदनशील भागांतून पोलिसांचे संचलन झाल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले. सणाच्या पार्श्वभूमीवर शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक ती तयारी केल्याचे या रूट मार्चमधून स्पष्ट झाले. ईद-ए-मिलाद सणाच्या काळात नागरिकांनी शांतता आणि सामाजिक सलोखा कायम ठेवावा, तसेच कोणत्याही अफवा किंवा अनुचित प्रकारांना बळी पडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. शहरातील संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची नजर राहणार असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाणार आहे.



