Home क्राईम जळगाव बसस्थानकातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड ; दोन सराईत महिला ताब्यात, १.०५...

जळगाव बसस्थानकातील सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड ; दोन सराईत महिला ताब्यात, १.०५ लाखांचे दागिने हस्तगत

0
15


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगावच्या नवीन बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या दोन सराईत महिलांना जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासात दोन्ही महिलांचा सहभाग समोर आला. त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांतील एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून, बसस्थानकातील चोरीच्या आणखी घटनांचा छडा लागण्याची शक्यता आहे.

१८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास नवीन बसस्थानक, जळगाव येथे जळगाव ते चाळीसगाव जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली होती. यामध्ये अंदाजे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र आणि ५ ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे टॉगल असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला होता.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून २० जुलै रोजी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २२६/२०२६, भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांना सखोल तपास करून आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार अनिल वाघ यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून विविध माहिती संकलित केली. तसेच बसस्थानक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पडताळणी सुरू केली.

तपासादरम्यान पोलिसांना विश्वसनीय गोपनीय बातमीदारामार्फत या गुन्ह्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. माहितीची पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी उषा चंदन ससाणे (वय ४८, रा. नारायणवाडी, इंदिरानगर, ता. चाळीसगाव, ह.मु. हरिविठ्ठल नगर, जळगाव) आणि अनिता विजय ससाणे (वय ३५, रा. राजीव गांधी नगर, बाघ नगर, जळगाव) या दोघींना ताब्यात घेतले.

दोन्ही महिला आरोपी नात्याने देराणी-जेठाणी असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्ण आणि सखोल चौकशी केली असता जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक २२६/२०२६ सोबतच गुन्हा क्रमांक १७३/२०२६ आणि २१२/२०२६ या प्रकरणांमध्येही सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पंचांच्या उपस्थितीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरोपींकडून तीन प्रकारचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यामध्ये ४५ हजार रुपये किमतीची अंदाजे ८ ते ९ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी मंगळसूत्र असलेली पोत आणि अंदाजे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टॉगल, १५ हजार रुपये किमतीची अंदाजे ४ ते ५ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी मंगळसूत्र असलेली पोत तसेच ४५ हजार रुपये किमतीची अंदाजे ७ ते ८ ग्रॅम वजनाची सोन्याची मणी मंगळसूत्र असलेली पोत यांचा समावेश आहे. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे बसस्थानकातील चोरीच्या गुन्ह्यांचा तपास पुढे जाण्यास मदत झाली आहे.

दरम्यान, दोन्ही महिला आरोपींचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासण्यात आले असता अमळनेर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३७९ अंतर्गत तसेच जळगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे या आरोपींचा आणखी काही चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे का, याचा तपासही सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक १०७८ संतोष सोनवणे, जिल्हापेठ पोलीस ठाणे, जळगाव हे करीत आहेत. तपासादरम्यान आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, नरेश सोनवणे, महेंद्र पाटील, किरण वानखेडे, तेजस मराठे, पोलीस कॉन्स्टेबल कमलाकर बडगुजर, प्रशांत सैंदाणे, अजय अहिरे, अजय सपकाळे, नरेंद्र दिवेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल वैशाली सोनवणे, सुषमा ढमढेरे तसेच नेत्रम शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख आणि पोलीस नाईक रुस्तम तडवी यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली.


Protected Content

Play sound