जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती कोणत्याही क्षणी उद्भवू शकतात. अशा संकटाच्या परिस्थितीत घाबरून न जाता योग्य निर्णय घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचे प्राथमिक कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था, वांद्रे (पूर्व), मुंबईचे प्रशिक्षक फहीम पटेल यांनी केले. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीला ज्येष्ठ शिक्षक डॉ. अतुल इंगळे यांनी प्रशिक्षक फहीम पटेल यांचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. यावेळी पटेल यांनी नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी स्वतःचे आणि इतरांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. आपत्तीच्या वेळी तातडीने योग्य कृती करणे, उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करणे आणि संकटग्रस्त व्यक्तीला सुरक्षितपणे मदत पोहोचविणे यासाठी आवश्यक कौशल्यांवर त्यांनी विशेष भर दिला. दुर्गम भागात एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यास किंवा आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेण्याची आवश्यकता भासल्यास स्ट्रेचर उपलब्ध नसल्याच्या परिस्थितीत काय उपाय करता येतील, याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले. उपलब्ध साधनांचा वापर करून सुरक्षितरीत्या रुग्णाची वाहतूक कशी करता येऊ शकते, याबाबत प्रात्यक्षिकातून माहिती देण्यात आली.

सर्पदंशाच्या प्रसंगी घाबरून न जाता कोणती खबरदारी घ्यावी, तसेच संबंधित व्यक्तीला वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत कोणत्या बाबींची काळजी घ्यावी, याचीही माहिती कार्यशाळेत देण्यात आली. आपत्कालीन परिस्थितीत चुकीच्या उपायांपेक्षा तातडीने योग्य वैद्यकीय मदत मिळवून देणे महत्त्वाचे असल्याचे प्रशिक्षकांनी स्पष्ट केले. आकस्मिक आग लागल्यास परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निरोधक सिलिंडरचा वापर कसा करावा, त्याची हाताळणी कशी करावी आणि आग विझविताना कोणती काळजी घ्यावी, याचेही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर करण्यात आले. या प्रात्यक्षिकात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपत्तीच्या वेळी उपयोगी ठरणारी प्राथमिक कौशल्ये जाणून घेतली. आपत्ती व्यवस्थापन केवळ प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी नसून आपत्कालीन परिस्थितीत प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत कौशल्ये अवगत असणे आवश्यक आहे. संकटाच्या वेळी संयम, प्रसंगावधान आणि योग्य कृती यामुळे जीवितहानी कमी करण्यास मदत होऊ शकते, असा संदेश या कार्यशाळेतून विद्यार्थ्यांना देण्यात आला. कार्यक्रमास महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. राजश्री महाजन, पर्यवेक्षिका प्रा. शिल्पा सरोदे आणि समन्वयक प्रा. गुणवंत वंजारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल इंगळे यांनी केले, तर प्रा. राजेंद्र निकुंभ यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. जयंत इंगळे, प्रा. स्वप्ना पाटील, प्रा. राजेश साळुंखे, प्रा. मीनल पाटील, प्रा. सी. एन. बेंडाळे आणि प्रा. गणेश सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.



