Home Cities जळगाव नशिराबादमध्ये भाजपची भव्य मोटारसायकल रॅली; ‘सेवा हाच संकल्प, राष्ट्रसेवा हेच ध्येय’चा दिला...

नशिराबादमध्ये भाजपची भव्य मोटारसायकल रॅली; ‘सेवा हाच संकल्प, राष्ट्रसेवा हेच ध्येय’चा दिला संदेश

0
9

नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारप्रमुख म्हणून २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानाला’ नशिराबाद येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अभियानांतर्गत भाजपच्या वतीने मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. ‘सेवा हाच संकल्प, राष्ट्रसेवा हेच ध्येय’ या घोषवाक्यातून राष्ट्रहित, देशसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

रॅलीचा शुभारंभ भवानी मंदिर परिसरातून करण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून मोटारसायकल रॅलीला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅलीच्या माध्यमातून सेवा, समर्पण आणि राष्ट्रहिताच्या विचारांचा प्रसार केला. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने समाजसेवा आणि राष्ट्रहिताच्या विचारांचा वाहक म्हणून कार्य करावे, तसेच पक्ष संघटनेची ताकद आणि एकजूट जनतेसमोर अधोरेखित व्हावी, या उद्देशाने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलेल्या मार्गदर्शनाचे एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी देशातील प्रत्येक नागरिक आणि भाजप कार्यकर्त्याचा सहभाग महत्त्वाचा असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाला भाजप पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, राजेंद्र सोनवणे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील आणि मिलिंद चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करत अभियानाचा उद्देश आणि पक्ष कार्यकर्त्यांची भूमिका याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी भाजप न.पा. गटनेते लालचंद पाटील, नगरसेवक प्रदीप बोढरे, मनोज पाटील, सचिन चौधरी, किरण पाटील, राजेंद्र पाचपांडे यांच्यासह अण्णा नगर परिसरातील बूथप्रमुख, पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे रॅलीला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. ‘सेवा संकल्प अभियानाच्या’ माध्यमातून पक्षाच्या विचारांसोबतच सामाजिक बांधिलकीचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. राष्ट्रसेवा, समाजसेवा आणि संघटनात्मक एकजुटीच्या माध्यमातून विकसित भारताच्या संकल्पनेत योगदान देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद रंधे यांनी केले, तर कीर्तीकांत चोबे यांनी आभार मानले. भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने मोटारसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.


Protected Content

Play sound