Home Cities मुक्ताईनगर जे ई स्कूलमध्ये निवृत्त एअर व्हाईस मार्शल प्रवीण कुमार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

जे ई स्कूलमध्ये निवृत्त एअर व्हाईस मार्शल प्रवीण कुमार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

0
10


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथील जे ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सोमवारी प्रेरणादायी व्याख्यान व करिअर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. भारतीय वायुसेनेचे निवृत्त एअर व्हाईस मार्शल तथा AVSM आणि VSM पुरस्काराने सन्मानित प्रवीण कुमार यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र दलातील करिअरच्या संधी, यशाचे मंत्र आणि देशसेवेचे महत्त्व याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, आत्मविश्वास आणि करिअरबाबत नवी ऊर्जा निर्माण झाली.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्त एअर व्हाईस मार्शल प्रवीण कुमार यांच्यासह एसकेआयटीएम (SKITM), इंदूरचे प्राचार्य डॉ. संजय पुरकर उपस्थित होते. दीपप्रज्वलन आणि मान्यवरांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आणि मान्यवरांचा परिचय एस. आर. ठाकूर यांनी ओजस्वी शैलीत करून दिला. त्यांच्या देशभक्तीपर शेरो-शायरीने कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.

भारतीय वायुसेनेत तब्बल ३६ वर्षे सेवा बजावलेल्या प्रवीण कुमार यांना शौर्यपूर्ण योगदानाबद्दल तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते AVSM (Ati Vishisht Seva Medal) आणि VSM (Vishisht Seva Medal) हे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. सध्या ते एसकेआयटीएम, इंदूर येथे Dean (SW) आणि CAO म्हणून कार्यरत असून UPSC Expert Member म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत. आपल्या मार्गदर्शनात त्यांनी विद्यार्थ्यांना NDA, AFCAT, CDS आणि SSB मुलाखतीची तयारी कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. यशासाठी शिस्त, जिद्द आणि देशभक्ती या तीन मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. “गणवेश हा केवळ कपडा नसून ती एक मोठी जबाबदारी आहे. तुमच्या प्रत्येक स्वप्नामागे तुमच्या कुटुंबाचा आणि देशाचा अभिमान दडलेला असतो. अपयश आले तरी खचू नका, कारण मंजिल मिळते ती संघर्षातूनच,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. वायुसेनेतील आपल्या सेवाकाळातील अनेक अनुभव आणि प्रसंग विद्यार्थ्यांसमोर मांडताना त्यांनी देशसेवा, नेतृत्वगुण आणि संकटांवर मात करण्याची मानसिकता यांचे महत्त्व स्पष्ट केले. SSB मुलाखत, शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेची तयारी करताना कोणत्या बाबींकडे लक्ष द्यावे, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना व्यावहारिक टिप्स दिल्या.

एसकेआयटीएम, इंदूरचे प्राचार्य डॉ. संजय पुरकर यांनी विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवड, स्पर्धा परीक्षांचे नियोजन आणि कौशल्य विकासाचे महत्त्व पटवून दिले. बदलत्या स्पर्धात्मक युगात योग्य दिशा, नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास यामुळेच यश मिळते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य व्ही. एम. चौधरी, उपप्राचार्य व्ही. के. शिर्के, पर्यवेक्षक व्ही. डी. बऱ्हाटे, के. आर. कवळे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी “जय हिंद”च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून सोडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound