Home Cities जळगाव PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू ; पात्र विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी ऑनलाइन अर्ज...

PM-YASASVI शिष्यवृत्तीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू ; पात्र विद्यार्थ्यांनी 31 ऑक्टोबरपूर्वी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

0
109

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी केंद्र पुरस्कृत PM-YASASVI शिष्यवृत्ती योजना अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी तसेच संबंधित शाळा आणि महाविद्यालयांनी या प्रक्रियेची दखल घेऊन ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाने केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणारी ही योजना विजाभज (VJNT), इमाव (OBC) आणि विमाप्र (SBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. या योजनेंतर्गत इयत्ता ९ वी व १० वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीचा, तर मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ दिला जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. पात्र विद्यार्थ्यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) वर ऑनलाइन नोंदणी करून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली असून, त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची पडताळणी संबंधित शाळा व महाविद्यालयांकडून केली जाणार आहे. इन्स्टिट्यूट लेव्हल व्हेरिफिकेशनची प्रक्रिया १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करावी लागणार असल्याने शैक्षणिक संस्थांनीही निर्धारित वेळेत पडताळणीची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अर्ज प्रक्रियेदरम्यान तांत्रिक किंवा अन्य कोणतीही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जळगाव कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक संचालक विशाल पं. पाटील यांनी केले आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज करताना सर्व माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound