जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कारगिल विजय दिनानिमित्त जळगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान आणि भारत विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या समाजोपयोगी उपक्रमात तब्बल ११५ रक्तदात्यांनी रक्तदान करून कारगिलच्या वीर जवानांना अनोखी मानवंदना अर्पण केली. देशभक्ती, समाजसेवा आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.
दि. २६ जुलै रोजी आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी जळगावच्या प्रथम नागरिक तथा महापौर सौ. दीपमाला काळे, भारत विकास परिषदेचे प्रांताध्यक्ष अनिरुद्ध कोटस्थाने, प्रांताधिकारी चोरडिया, लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शाहीर संग्राम जोशी, सचिव शाहीर संदीप जोशी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मनोगतात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत रक्तदान हे सर्वोच्च मानवसेवेचे कार्य असल्याचे सांगितले. वेळेवर रक्त उपलब्ध झाल्यामुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचतात. लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठान गेल्या अनेक वर्षांपासून निःस्वार्थ भावनेने समाजोपयोगी कार्य करत असून, ही संस्था समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. कारगिल विजय दिनाचे औचित्य साधत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या सेवेत कार्यरत असलेल्या दोन बॉडीगार्ड्सचा विशेष सत्कार करून त्यांच्या राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच भविष्यातही अशा समाजहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचे आवाहन करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमादरम्यान शाहीर संग्राम जोशी आणि शाहीर संदीप जोशी यांनी कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्यगाथेला उजाळा देणारा आणि रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा दमदार पोवाडा सादर केला. त्यांच्या ओजस्वी सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीही या पोवाड्याचे विशेष कौतुक करत लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य प्रभावीपणे होत असल्याचे सांगितले. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच समाजसेवा, आरोग्यसेवा आणि सामाजिक कार्यामधील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. नीलिमा सेठिया, डॉ. सई नेमाडे, दर्शन जोशी आणि महेश दीक्षित यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांच्या कार्याचा गौरव केला.
शिबिरात सहभागी झालेल्या ११५ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. कारगिलच्या वीर जवानांना अभिवादन करण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते सोमनाथ महाजन यांनी केले. त्यांनी कारगिल विजय दिनाचे ऐतिहासिक महत्त्व आणि रक्तदानाच्या सामाजिक उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे सचिव शाहीर संदीप जोशी यांनी केले. त्यांनी प्रमुख पाहुणे, मान्यवर, रक्तदाते, भारत विकास परिषद, सहकार्य करणाऱ्या संस्था, स्वयंसेवक आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले.



