जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शिक्षणाच्या प्रवासात आर्थिक अडचणी अडथळा ठरू नयेत आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक बळ मिळावे, या सामाजिक भावनेतून जळगावात रविवारी 1500 होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुरेश सुरळकर यांनी मातोश्री बेबीबाई सुरेश सुरळकर यांच्या प्रेरणेतून आयोजित केलेल्या या उपक्रमाला विविध सामाजिक संस्था, उद्योजक आणि मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रविवार, २६ जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमात तब्बल 1500 मुला-मुलींना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि पालकांच्या डोळ्यांत समाधान पाहायला मिळाले. शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात अधिक आत्मविश्वासाने होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

हा उपक्रम जैन इरिगेशन सिस्टीम, अण्णासाहेब सागरमल सांखला सोसायटी, रोहित कन्स्ट्रक्शन, नंदिनी ट्रेडिंग कंपनी आणि तरुण कुढापा मंडळ यांच्या संयुक्त सहकार्याने पार पडला. विशेष म्हणजे हा उपक्रम सलग आठव्या वर्षी राबविण्यात आला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आला. कार्यक्रमास उपमहापौर मनोज चौधरी, शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख तथा नगरसेवक शरद तायडे, महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य विशाल भोळे, अण्णासाहेब सागरमल सांखला पतसंस्थेचे चेअरमन सुभाष सांखला, जैन इरिगेशनचे अधिकारी अनिल जोशी, डॉ. निलेश चांडक, सामाजिक कार्यकर्ते शोएब खाटीक, राजकुमार वाणी, मातोश्री बेबीबाई सुरळकर, मुन्ना परदेशी, राजेंद्र पाटील, सरला चौधरी, संगीता सूर्यवंशी, निर्मला चौधरी, रामचंद्र चौधरी, सुभाष चौधरी, अलका सोनवणे, निलेश देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक प्रशांत सुरेश सुरळकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना उपमहापौर मनोज चौधरी म्हणाले की, जिद्द, मेहनत आणि शिकण्याची आवड हेच यशाचे खरे सूत्र आहे. ज्ञानाची ज्योत कायम प्रज्वलित ठेवा आणि शिक्षणाच्या बळावर आपल्या आयुष्याला नवी दिशा द्या.
शिवसेना (ठाकरे गट) महानगरप्रमुख शरद तायडे यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणा, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असा विश्वास व्यक्त केला. हे शालेय साहित्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीत नवी ऊर्जा निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले. स्थायी समिती सदस्य विशाल भोळे यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रगती करून कुटुंब आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी डॉ. निलेश चांडक आणि माजी अधीक्षक राजकुमार वाणी यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयाज मोहसीन यांनी केले, तर रोहिणी सुरळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुन्ना मराठे, भैय्या ठाकूर, अनिल ठाकूर, सुभाष जंगले, प्रकाश चौधरी, राहुल चौधरी, योगेश पाटील, दीपक ठाकूर, कल्पेश बनवे, यश चौधरी, नारायण कोळी, चंद्रकांत सोनवणे, रवींद्र लुले, निलेश पाटील, हितेश वाणी, कन्हैया चौधरी, निलेश कोळी, संदीप चौधरी, भूषण चौधरी, सचिन भावसार, वैभव सूर्यवंशी, संदीप भावसार, पंकज भावसार, पवन भावसार, सचिन चौधरी आणि शंभू भावसार यांनी परिश्रम घेतले.
शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला हा उपक्रम अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला. सामाजिक बांधिलकी जपत गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.



