रायपूर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील रायपूर येथे कारगिल विजय दिनानिमित्त मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये देशभक्तीपर वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अमर शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शौर्य आणि राष्ट्रसेवेची भावना जागृत करण्याचा संदेश देण्यात आला. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धाचा सजीव देखावा सादर करत उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाची सुरुवात अमर जवानांना अभिवादनाने झाली. गजेंद्र परदेशी सर, सौ. भारती परदेशी मॅडम, सोनाली देसले मॅडम आणि सौ. मयुरी वाघ मॅडम यांच्या हस्ते वीर शहीद जवानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ज्योत प्रज्वलित करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना आदरांजली वाहिली. यानंतर विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धावर आधारित सजीव देखावा सादर केला. भारतीय जवानांचे शौर्य, प्रतिकूल परिस्थितीत केलेला संघर्ष आणि तिरंग्याचा विजय यांचे प्रभावी चित्रण चिमुकल्यांनी आपल्या अभिनयातून साकारले. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना बेसिक रायफल शूटिंगचे प्रात्यक्षिक व प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. देशाच्या सुरक्षेसाठी लष्कराची भूमिका, शिस्त, धैर्य आणि देशसेवेचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

यावेळी मार्गदर्शन करताना गजेंद्र परदेशी सर यांनी कारगिल विजय दिनाचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, २६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन विजय’ यशस्वी करून कारगिलच्या बर्फाच्छादित शिखरांवरून पाकिस्तानी घुसखोरांना परतवून लावत तिरंगा अभिमानाने फडकावला. उणे १० अंश सेल्सिअस तापमान आणि सुमारे १६ हजार फूट उंचीवर लढल्या गेलेल्या या युद्धात भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्याचे दर्शन घडविले. त्यांनी कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे, कॅप्टन अनुज नय्यर यांच्यासह कारगिल युद्धातील सर्व वीर जवानांच्या पराक्रमाचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा दिली. देशासाठी ५२७ जवानांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण प्रत्येक भारतीयाने कायम ठेवले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थितांना देशसेवेची शपथ देण्यात आली. “आपले सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत आहेत, त्यामुळे आपण सुरक्षित आणि शांततेत जीवन जगू शकतो. त्यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवत प्रत्येकाने आपल्या देशाप्रती असलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प करावा,” असे आवाहन यावेळी करण्यात आले. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, राष्ट्रनिष्ठा, शिस्त आणि सैनिकांविषयी आदराची भावना दृढ झाली. शैक्षणिक उपक्रमासोबतच राष्ट्रीय मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर करण्याचा मयुरेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलचा हा उपक्रम सर्व स्तरांतून कौतुकास पात्र ठरला.



