Home Cities यावल आषाढी एकादशीनिमित्त किनगाव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची दिंडी

आषाढी एकादशीनिमित्त किनगाव इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची दिंडी

0
5

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने यावल तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडियम निवासी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी पारंपरिक दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मीराबाई यांसह विविध संतांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि “विठ्ठल… विठ्ठल…” नामस्मरण करत काढलेल्या दिंडीमुळे संपूर्ण शाळा परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज्यभरातील वारकरी पायी दिंडी काढत पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. या पवित्र परंपरेचा अनुभव विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मिळावा, वारकरी संप्रदायाची संस्कृती आणि भक्तीपरंपरा त्यांच्यापर्यंत पोहोचावी या उद्देशाने किनगाव-डोंगाव रोडवरील इंग्लिश मिडियम निवासी पब्लिक स्कूलतर्फे विशेष दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

दिंडीच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत मीराबाई तसेच विविध संतांच्या आकर्षक वेशभूषेत सजविण्यात आले. त्यानंतर उपमुख्याध्यापक सुहास भालेराव, हर्षल मोरे, गोपाल चित्ते, राजश्री अहिरराव, सोनाली कासार, प्रतिभा धनगर आणि योगिता सावळे यांच्या हस्ते पालखी, विठ्ठल-रुक्मिणी आणि भजनी मंडळाचे औक्षण करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांची दिंडी वर्गखोल्यांपासून शाळेच्या संपूर्ण परिसरात काढण्यात आली. टाळ, मृदुंग, अभंग आणि विठ्ठल नामाच्या अखंड गजरात विद्यार्थ्यांनी वारकरी परंपरेचा उत्साह अनुभवला. वारकऱ्यांप्रमाणे पायी चालत विठुरायाच्या भेटीसाठी जाण्याची भावना विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली. दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी लोटांगण घालणे, फुगड्या खेळणे अशा पारंपरिक वारकरी संस्कृतीतील विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या सोहळ्यास स्कूलचे सचिव तथा संचालक मनीष विजयकुमार पाटील, स्व. केतनदादा मल्टी पर्पज फाउंडेशनच्या संचालिका सौ. पूनम मनीष पाटील, मुख्याध्यापक अशोक प्रतापसिंग पाटील, उपमुख्याध्यापक सुहास भालेराव यांच्यासह शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने सादर केलेल्या दिंडीमुळे उपस्थित पालक आणि शिक्षकही भारावून गेले. दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी भावना चोपडे, प्रतिभा धनगर, वैशाली मराठे, तिलोत्तमा महाजन, ज्ञानेश्वर धनगर, सोनाली पाटील, हर्षदा पाटील, नूतन देशमुख, सोनाली वाणी, सूरज भालेराव, पुरुषोत्तम पाटील, गोकुळ धर्माधिकारी आणि निलेश माळी यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound