Home Cities जळगाव कायद्याचे ज्ञान, निसर्गाचा सहवास आणि आनंदी क्षण; पदमालयात बालगृहातील मुलांची अविस्मरणीय सहल

कायद्याचे ज्ञान, निसर्गाचा सहवास आणि आनंदी क्षण; पदमालयात बालगृहातील मुलांची अविस्मरणीय सहल

0
3

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बालगृहातील मुलांमध्ये कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्याबरोबरच त्यांना निसर्गाच्या सानिध्यात आनंददायी अनुभव मिळावा, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या पुढाकारातून पदमालय येथे विधी साक्षरता शिबीर आणि निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले. विविध शासकीय विभागांच्या संयुक्त सहकार्याने झालेल्या या उपक्रमात मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विधी साक्षरतेसोबतच निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव, तालुका विधी सेवा समिती एरंडोल, जिल्हा व सत्र न्यायालय, जळगाव, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, महिला व बालविकास विभाग तसेच बालगृह यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २६ जुलै रोजी पदमालय येथे या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. जोशी यांच्या हस्ते झाला.

यावेळी जिल्हा न्यायाधीश-१ एस. व्ही. खोंगल, जिल्हा न्यायाधीश-६ आर. एस. साळगांवकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एन. एस. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) आर. टी. घोगले, एरंडोल येथील दिवाणी न्यायाधीश संजय चव्हाण, पोलीस उपअधीक्षक गणापुरे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती शिर्के, पोलीस निरीक्षक पवार, वनविभागाचे अधिकारी पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी काळे, बालगृहाचे अधीक्षक अहिरराव, जिल्हा न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक निलेश सूर्यवंशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी आर. के. पाटील, प्रमोद बी. ठाकरे, पवार, बालन्याय मंडळाचे कर्मचारी अनिल बारी, सचिन पाटील तसेच महसूल, पोलीस, वनविभाग आणि विधी सेवा समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अध्यक्ष आर. एन. जोशी यांनी बालगृहातील मुलांशी संवाद साधत त्यांना त्यांच्या हक्कांविषयी, कायदेशीर सहाय्याची गरज आणि समाजात आत्मविश्वासाने वावरण्याचे महत्त्व समजावून सांगितले. मुलांना सहलीनिमित्त खाऊ व विविध उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले.

त्यानंतर मुलांना पदमालय येथील प्रसिद्ध मंदिर तसेच परिसरातील निसर्गरम्य स्थळांची सफर घडविण्यात आली. या प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि तालुका विधी सेवा समितीच्या कार्याची माहिती मुलांना सोप्या भाषेत देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध वनस्पती, जैवविविधता, वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत मार्गदर्शन करून मुलांमध्ये निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण सहलीदरम्यान मुलांनी उत्साहाने विविध उपक्रमांत सहभाग घेतला. कायदेविषयक माहिती, निसर्ग निरीक्षण आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाच्या समारोपावेळी तालुका विधी सेवा समिती, एरंडोल यांच्या वतीने मुलांना पुस्तके आणि खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे बालगृहातील मुलांना विधी साक्षरतेचा महत्त्वपूर्ण धडा मिळाल्याबरोबरच आनंददायी निसर्ग सहलीची अविस्मरणीय भेट लाभली.


Protected Content

Play sound