Home Cities जळगाव जळगावात १३ जुलै रोजी ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा’ ; ITI, डिप्लोमा व...

जळगावात १३ जुलै रोजी ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा’ ; ITI, डिप्लोमा व पदवीधरांना सुवर्णसंधी

0
8


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तसेच दहावी, बारावी, डिप्लोमा आणि पदवीधर युवक-युवतींसाठी रोजगाराच्या दिशेने महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय अप्रेंटिसशिप योजनेअंतर्गत ‘पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा’ (PM National Apprenticeship Mela) येत्या १३ जुलै २०२६ रोजी जळगाव येथे आयोजित करण्यात आला असून, जिल्ह्यातील तसेच बाहेरील नामांकित उद्योगांमध्ये अप्रेंटिसशिप मिळविण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध होणार आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), जळगाव येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील तंत्रनिकेतनसमोर हा मेळावा १३ जुलै रोजी सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (ITI) विविध व्यवसायांचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिल्पकारागिरांसह दहावी, बारावी, डिप्लोमा आणि पदवीधर उमेदवारांनाही या मेळाव्यात सहभागी होता येणार आहे. पंतप्रधान राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) योजनेअंतर्गत आयोजित या मेळाव्यात जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. उद्योग क्षेत्रातील अनुभवी कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळाल्याने उमेदवारांना प्रत्यक्ष औद्योगिक अनुभवासह भविष्यातील रोजगाराच्या संधी अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. कौशल्य विकास, तांत्रिक अनुभव आणि रोजगारक्षमतेत वाढ करण्याच्या दृष्टीने हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ApprenticeshipIndia.org या अधिकृत वेब पोर्टलवर पूर्वनोंदणी (Registration) करणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, छायाचित्रे व इतर आवश्यक प्रमाणपत्रांसह मेळाव्याच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार, मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र (BTIU), जळगाव यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या अप्रेंटिसशिप योजनेमुळे उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत असताना युवकांनाही प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि रोजगाराच्या नव्या संधी मिळत आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा लाभ घेऊन आपल्या करिअरला नवी दिशा द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


Protected Content

Play sound