Home Cities जळगाव कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी राज्यात विशेष मोहीम

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेसाठी राज्यात विशेष मोहीम

0
7


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आणि शेतीला आधुनिक पायाभूत सुविधांची जोड देण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या कृषी पायाभूत सुविधा निधी (Agriculture Infrastructure Fund – AIF) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यभर विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), सहकारी संस्था, कृषी उद्योजक आणि स्वयं सहायता गटांना सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असून, जळगाव जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयामार्फत ऑगस्ट २०२० मध्ये आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ही योजना सुरू करण्यात आली. पिक काढणीनंतर शेतमालाची साठवणूक, प्रक्रिया, मूल्यवर्धन, वाहतूक आणि विपणनासाठी आवश्यक असलेल्या आधुनिक कृषी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी या योजनेत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाते. त्यामुळे शेतमालाचे नुकसान कमी होऊन शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळण्यास मदत होत आहे. या योजनेअंतर्गत बँकांमार्फत मंजूर होणाऱ्या २ कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३ टक्के व्याज सवलत शासनाकडून दिली जाते. तसेच पात्र लाभार्थ्यांना क्रेडिट गॅरंटीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येते. यामुळे कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणुकीला चालना मिळून आधुनिक सुविधा उभारण्यास मोठी मदत होत आहे.

योजनेमध्ये गोदामे, शीतगृहे (कोल्ड स्टोरेज), पॅक हाऊस, ग्रेडिंग आणि सॉर्टिंग युनिट, प्राथमिक प्रक्रिया केंद्रे, कृषी लॉजिस्टिक्स, सायलो, रिपनिंग चेंबर, ई-मार्केट सुविधा, जैव-इनपुट उत्पादन युनिट, कस्टम हायरिंग सेंटर तसेच इतर विविध कृषी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. या सुविधांमुळे शेतमालाची गुणवत्ता टिकवून ठेवणे, बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे आणि मूल्यवर्धन करणे अधिक सुलभ होणार आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS), सहकारी संस्था, कृषी उद्योजक, स्टार्टअप्स, स्वयं सहायता गट (SHGs) तसेच कृषी क्षेत्रातील इतर पात्र संस्थांना घेता येणार आहे. त्यामुळे कृषी व्यवसायाशी संबंधित विविध घटकांना आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेष अंमलबजावणी मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात शेतकरी मेळावे, जनजागृती अभियान, कार्यशाळा, बँक समन्वय बैठका आणि लाभार्थी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून इच्छुक लाभार्थ्यांना योजनेची माहिती, अर्ज प्रक्रिया आणि कर्ज मिळविण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. पात्र शेतकरी, संस्था आणि कृषी उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी, आत्मा (ATMA), कृषी विभाग किंवा जवळच्या राष्ट्रीयीकृत अथवा अनुसूचित बँकेशी संपर्क साधावा. तसेच https://agriinfra.dac.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प संचालक, आत्मा तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.


Protected Content

Play sound