शिक्षणमंत्र्यांचे वाहन रोखणाऱ्या अभाविपची सखोल चौकशी करा

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शुक्रवारी १८ रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे वाहन रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभाविपच्या कार्यकर्त्यांची व घटनेची निष्पक्ष सखोल चौकशी करावी, अशी मागणी युवा सेने जळगाव जिल्हा आणि अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे यांनी केली आहे. घटनेला व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांच्यासह कुलगुरू देखील जबाबदार आहे का? असाही सवाल युवा सेनेने विचारला आहे. याबाबतचे निवेदन सोमवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि कुलगुरू पी.पी.पाटील यांना देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची पूर्ण महाराष्ट्रात गौरवशाली परंपरा आहे. विद्यापीठात अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार योग्य नियोजन व्हावे याकरिता विविध सूचना देण्यासाठी आणि परीक्षांच्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी १८ रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत हे विद्यापीठात आले होते. विद्यार्थ्यांचे परीक्षांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून ना. सामंत यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि कुलगुरू यांच्या समन्वयाने परीक्षांचे नियोजन करण्यासाठी सुसूत्र बैठक घेतली.

ना. सामंत साहेब यांची पत्रकार परिषद आटोपल्यावर संध्याकाळी ते परतत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी अभाविपचे झेंडे फडकावले. हा प्रकार निंदनीय आहे. अभाविपचे कार्यकर्ते हे निवेदन न देता केवळ आंदोलन करण्याचा प्रयत्न करतात. हा प्रकार त्यांनी यापूर्वी धुळे, अमरावती येथे देखील करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

अभाविपच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देण्यासाठी ना.उदय सामंत यांचे पीए गिरीश लोहार यांना सांगितले. त्यांनी ४ जणांनी येऊन भेटा असा त्यांना निरोप दिला. मात्र आम्ही ८ ते १० जणांना भेटायचे आहे असा सारखा घोषा अभाविपचे कार्यकर्त्यांनी लावला होता. त्यांना अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी देखील समजावले. त्यामुळे त्यांनी निवेदन न देता थेट आंदोलनाच्या पावित्र्यात दिसून आले. त्यानंतर त्यांनी ना. उदय सामंत यांचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला. युवा सेना संघटनेच्या कार्यकर्त्यांना मुख्य प्रवेशद्वाराबाहेर थांबविण्यात आले होते मग हे अभाविपचे कार्यकर्ते प्रवेशद्वारातुन आत कसे आले ? त्यांच्यामागे कोणाचा हात आहे ? त्यांच्याजवळ झेंडे, काठ्या होत्या असे समजते, मग त्यांचा उद्देश नेमका काय होता ? हे विद्यार्थी होते मग गुंडगिरी पद्धतीने का वागले ? विद्यापीठात व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांची हुकुमशाही चालते. त्यांना शिक्षणमंत्री सामंत साहेबांच्या सोबतच्या बैठकीचे आमंत्रण नव्हते, म्हणून त्यांनी या विद्यार्थ्यांना फूस लावली होती का ? या सर्व घटनेची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

आपण पालकमंत्री या नात्याने शासकीय पातळीवर सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत आहे. त्यातून विद्यापीठात पवित्र शैक्षणिक क्षेत्रात वातावण कोण कलुषित करित आहे ते देखील सत्य समोर येईल, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देतांना युवा सेना जिल्हा अधिकारी शिवराज पाटील, महानगर अधिकारी विशाल वाणी, विद्यापीठ संपर्क युवा अधिकारी अंकित कासार, उपजिल्हाप्रमुख विकास पाटील, विजय लाड, महेश ठाकूर आदी उपस्थित होते.

Protected Content