मतदान वाढीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम – मुख्य निवडणूक अधिकारी

jilhadhikari kaksh

जळगाव, प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक अधिकारी तसेच जिल्हा प्रशासनातर्फे स्वीप कार्यक्रमांतर्गंत विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले आहेत. मतदारांना मतदार चिठ्ठयांचे वाटप वेळेत पूर्ण करण्याच्या सुचना प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेवसिंह यांनी राज्यातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी यांना आज (दि.१८) दिल्या. जिल्हानिहाय विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा आज त्यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतला.

 

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी महसुल रविंद्र भारदे, प्रमोद बोरोले, प्रवीण पंडित, विलास बोडके, बी. जे. पाटील, श्वेता संचेती, शरद मंडलीक आदि उपस्थित होते.

यावेळी बलदेवसिंह म्हणाले की, मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी मतदारांना त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती उपलब्ध व्हावी, याकरीता मतदार चिठ्ठया वेळेत पोहोचवणे गरजेचे आहे. यावेळी त्‍यांनी जिल्हाधिकारी यांचेकडून जिल्ह्यातील मतदान तयारीचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी जिल्ह्यात मतदार चिठ्ठया व मतदार गाईडच्या वाटपाची माहिती, पाऊस येण्याची शक्यता लक्षात घेता स्ट्रॉग रुमची परिस्थिती, मतदान साहित्य पाठविण्याचे नियोजन, मतदान व मतमोजणीच्या तयारीची माहिती, संवेदशनशील मतदान केंद्र, सखी मतदान केंद्र, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मतदान केंद्रावरील सोयीसुविधा, दिव्यांग मतदारांना देण्यात येणाऱ्या सुविधा आदीबाबत माहिती दिली, तर पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस दलाचे रुटमार्च, कोम्बींग ऑपरेशन, तडीपारीच्या कारवाईबाबत माहिती दिली. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत १२ अग्नीशमन शस्त्र, ११ हत्यारे, २९ लाख १५ हजार रुपये रोकड, चेकपोस्टवर ३० हजार रुपयांचा माल तर १८ हजार लिटर अवैध दारु जप्त करण्यात आल्याची माहिती दिली. तसेच निवडणूकीच्या अनुषंगाने आवश्यक त्या बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आल्याचीही माहिती दिली.

Protected Content