जळगावात भेसळीच्या संशयातून खाद्यपदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त

BV Acharya 35

जळगाव, प्रतिनिधी | दिवाळी सणानिमित्त जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने खाद्यतेलाबाबत प्रशासनाने कडक धोरण स्वीकारले असून त्याअनुषंगाने अन्न व औषध प्रशासन जळगाव कार्यालयामार्फत विभागातर्फे तपासणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत येऊन भेसळीच्या संशयावरून पामोलीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

खाद्यतेल, रिपॅकर, घाऊक विक्रेते यांच्याकडुन शहरात तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी १३ नमुने घेतले आहे. तसेच ३ खाद्य तेल आस्थपनांकडील सुमारे २५०० किलोग्रॅम इतका शेंगदाणा तेल, आर.बी. डी पामोलीन तेलाचा साठा भेसळीच्या संशयावरुन जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी घेण्यात आलेले नमुने अन्न विश्लेषकांकडे विश्लेषणाकरिता पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्राप्त होताच पुढील योग्य ती कारवाई नियमानुसार करण्यात येईल. अशी माहिती अन्न व औषध प्रशासन सहायक आयुक्त यो. कों. बेंडकुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाई व दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढल्याने त्या पदार्थांमध्ये भेसळीची दाट शक्यता असते. त्यासंदर्भात देखील अन्न व औषध प्रशासनामार्फत अंकुश ठेवण्यात आला असून शहरातील विविध आस्थापनामधून मिठाई तसेच दुग्धजन्य पदार्थाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने मिठाई उत्पादक, विक्रेते, खाद्यतेल विक्रेते व इतर किरकोळ विक्रेत्यांवर ६४ ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या आहेत. खाद्यतेल, तुप, मिठाई, बेसण या अन्न पदार्थांचे भेसळीच्या संशयावरुन ५२ नमुने घेण्यात आलेले आहे. प्रशासनामार्फत जनतेस आवाहन करण्यात येते की, शिळी, स्वस्त दरातील, रंगीत, हलक्या दर्जाची मिठाई तसेच इतर अन्नपदार्थ पारखुन घ्यावेत. तसेच मावा, खवा, मिठाई घेतांना विशेष काळजी घ्यावी. मिठाइचे सेवन ८ तासाच्या आत करावे. पॅकबंद पदार्थांची खरेदी करतांना त्याचा समुह क्रमांक व उत्पादन तिथी तपासुन खरेदी करावेत. कुठलाही अन्न पदार्थ खरेदी करतांना विक्रेत्याकडून खरेदी बिल घ्यावे. असे आवाहन सहायक आयुक्त बेंडकुळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Protected Content