भगवान श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व दिव्य होते : हभप विशालशास्त्री गुरुबा

जळगाव प्रतिनिधी | भगवान श्रीकृष्णाचे मिळालेले तत्वज्ञान मानवजातीला मिळालेली सर्वात मोठी भेट असून तत्वज्ञान आणि व्यावहारिक दक्षता यांचा योग्य ताळमेळ श्रीकृष्णांकडे पाहायला मिळतो असे सांगत भगवान श्रीकृष्णाचे व्यक्तिमत्व दिव्य होते. असे प्रतिपादन हभप विशालशास्त्री गुरुबा यांनी केले. तरुण कुढापा चौकात संगीतमय श्रीमद भागवत कथेचे निरुपण करतांना ते बोलत होते.

धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यात अग्रेसर असलेले तरुण कुढापा मंडळातर्फे संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे महानगरपालिका शाळा क्रमांक ३, पांजरापोळ परिसर या ठिकाणी दि. २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे आयोजनाचे पाचवे वर्ष आहे. मंगळवारी दि. २८ डिसेंबर रोजी श्रीकृष्ण जन्म सोहळा साजरा झाला. यावेळी श्रीमद भागवत कथेत श्रीकृष्ण जन्म सोहळ्यात भाविक तल्लीन झाले.

यावेळी महानगरपालिकेच्या महापौर जयश्री महाजन, नगरसेविका मंगला चौधरी, डॉ.निलेश चांडक, रामदयाल सोनी, माजी नगरसेवक किशोर चौधरी, व्यावसायिक रवी शर्मा उपस्थित होते. हभप विशालशास्त्री गुरुबा यांनी, “भगवान श्रीकृष्ण यांचे आई वडील देवकी – वासुदेव यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली.
“भारतीय संस्कृतीत सर्व देवादिकांमध्ये श्रीकृष्णाला मानाचे व आदराचे स्थान असून कृष्णनीती ही भारताला दिलेली अमूल्य ठेव आहे. माणसाने त्याप्रमाणे वागल्यास त्याचे आयुष्य सुखी होते यात शंका नाही. भगवान श्रीकृष्णाचे जीवनचरित्र अद्भुत व रोमांचकारी असून धर्माचे रक्षण करण्याकरीता विष्णूने श्रीकृष्ण अवतार घेतला.” असे त्यानी सांगितले. मंगळवारी श्रीकृष्ण जन्माच्या सोहळ्यात गोपाळकाला व भक्तीगीतांचा आनंद भाविकांनी लुटला.

यावेळी महापौर जयश्री महाजन यांच्यासह भाविकांनी भजनावर ताल धरला होता. ‘जय कन्हैया लाल की’ म्हणत भाविकांनी एकच जल्लोष केला. बुधवारी दि. २९ डिसेंबर रोजी माख्खन चोरीची लीला भागवतकथेत वर्णिली जाणार आहे. दुपारी १.३० वाजता भाविकांनी मनपा शाळा क्र. ३ येथे उपस्थिती देऊन लाभ घ्यावा असे आवाहन तरुण कुढापा मंडळातर्फे अध्यक्ष पंकज भावसार, उपाध्यक्ष सुमित सपकाळे, कार्याध्यक्ष शंभू भावसार यांनी केले आहे.

Protected Content