जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद संबंधित कार्यालयांतर्गत येणाऱ्या विविध शाखा कार्यालयांमध्ये नागरिक आणि कर्मचाऱ्यांच्या वर्षानुवर्ष साचलेल्या तक्रारी आणि त्यांना वारंवार माराव्या लागणाऱ्या फेऱ्या आता थांबणार आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मिनल करणवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून दर महिन्यातून दोन वेळा तालुकास्तरावर तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे. यामुळे सर्व प्रकारच्या तक्रारींचे जागच्या जागी निराकरण केले जाईल आणि नागरिकांना ‘प्रशासन आपल्या दारी’ याचा प्रत्यय येईल.
तक्रार निवारण दिनाचे स्वरूप
या विशेष तक्रार निवारण दिनामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित राहणार आहेत. यामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळेल आणि त्यावर तातडीने तोडगा काढला जाईल. हा उपक्रम प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
पहिला तक्रार निवारण दिन धरणगाव येथे
या अभिनव योजनेअंतर्गत आज, बुधवार, २१ मे २०२५ रोजी पहिला तक्रार निवारण दिन धरणगाव पंचायत समिती येथे आयोजित करण्यात येणार आहे. या दिनास जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित राहतील.
सीईओ मिनल करणवाल यांनी धरणगाव तालुक्यातील ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, त्यांनी बुधवार, २१ मे रोजी धरणगाव पंचायत समिती येथे उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.