ऑर्केस्ट्रा कलावंतांवर अन्याय : हक्काच्या जागेसाठी एकजुटीचा लढा उभारणार !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील ऑर्केस्ट्रा कलाकारांवर वाढत्या अन्यायाविरोधात आवाज उठवत कलावंत एकत्र आले असून, आपले हक्क मिळवण्यासाठी आणि न्यायासाठी लढा उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. शिरसोली रोडवरील ‘अथांग फार्म हाऊस’ येथे झालेल्या बैठकीत कलावंतांनी शासनाकडून कल्याणकारी योजनांची मागणी करत, ऑर्केस्ट्रा कलावंतांच्या उपजीविकेच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याचे ठरवले. या बैठकीस जेष्ठ कलावंत व गायक मोहनदादा तायडे अध्यक्षस्थानी होते, तर प्रास्ताविक विजयकुमार कोसोदे यांनी केले आणि सूत्रसंचालन तुषार वाघुळदे यांनी केले.

बैठकीत जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा कलाकारांना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा झाली. कार्यक्रमांसाठी सभागृह उपलब्ध न होणे, मंगल कार्यालयांतील अवास्तव नियम, शासनाकडून मिळणाऱ्या मदतीचा अभाव, तसेच बदलत्या काळात कमी होणाऱ्या रोजगारामुळे कलाकार आर्थिक संकटात सापडल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली. अनेक कलाकारांना उपासमारीची वेळ आली असून, सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

जेष्ठ कलावंत विजयकुमार कोसोदे, दिनेश गोयर, सलमान शाह, रतनकुमार थोरात यांनी शासनाच्या उदासीन भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, असंघटित कलाकारांकडे कोणीही लक्ष देत नाही, त्यांच्या अडचणींकडे कोणीही पाहत नाही. तुळशी विवाहासारख्या हंगामी काळात जेव्हा कमाईची अपेक्षा असते, तेव्हाच अनेक हॉल आणि सभागृहधारक ऑर्केस्ट्रा कार्यक्रमांना बंदी आणतात. कलावंत रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करतात, मग त्यांच्यावर अन्याय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या बैठकीत भागवत पाटील, कांचन तायडे, जगदीश बिंद्रा, संदीप सोनार आणि युवराज वाघ यांसारख्या कलावंतांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत ऑर्केस्ट्रा क्षेत्र पूर्णपणे कोलमडले आहे. कमी बजेटचे आणि निधी संकलनासाठीचे कार्यक्रम करूनही अनेकांना जगणे कठीण झाले आहे. काही कलाकार नैराश्यात गेले असून, हातावर पोट असलेल्या वादक आणि मदतनीसांच्या स्थिती अधिकच बिकट आहे.

जेष्ठ कलावंत मोहनदादा तायडे आणि संजय सूर्यवंशी यांनी कलाकारांविषयी होत असलेल्या दुर्लक्षाचा निषेध करत शासनाने तत्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. त्यांनी स्पष्ट केले की, कलाकारांसाठी पेन्शन योजना, विमा सुविधा, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत स्वतंत्र घरकुल योजना सुरु करावी. शासनाने कलेच्या संवर्धनासाठी नवे उपक्रम हाती घेऊन कलावंतांना आत्मनिर्भर बनवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

निवेदक-कलावंत तुषार वाघुळदे यांनी कलाकारांच्या हितासाठी एकजुटीने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. हॉटेल रॉयल पॅलेसचे उद्योगपती प्रदीप आहुजा यांनी कलावंतांना न्याय मिळवून देण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. सर्व उपस्थितांनी कलाकारांच्या हक्कांसाठी एकत्र राहून पुढील धोरण आखण्याचे ठरवले.

या बैठकीस विजयकुमार कोसोदे, मोहनदादा तायडे, तुषार वाघुळदे, कांचन तायडे, रतनकुमार थोरात, निलेश पाटील, अशोक मालुसरे, दिनेश गोयर, सरदार तडवी, अजित भालेराव, जहूर पहेलवान, भागवत पाटील, संजय सूर्यवंशी, प्रमोद जोशी, कपिल घुगे, उद्योगपती प्रदीप आहूजा आणि ‘अथांग फार्म’च्या संचालिका लीला कोसोदे यांसह शहरातील अनेक कला-संगीत क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.