


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सतत पोटदुखी, पोटात जडपणा, दबाव जाणवणे आणि असामान्य रक्तस्त्राव अशा त्रासांनी ग्रस्त असलेल्या ४५ वर्षीय महिलेवर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या गर्भपिशवीतून तब्बल साडेतीन किलो वजनाची मोठी गाठ काढण्यात यश मिळविले आहे. वेळेवर निदान आणि तातडीच्या उपचारांमुळे महिलेची प्रकृती धोक्याबाहेर असून सध्या ती वेगाने बरी होत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील ४५ वर्षीय महिलेला गेल्या काही महिन्यांपासून पोटदुखी, पोटात जडपणा, सतत दबाव जाणवणे आणि अनियमित रक्तस्त्रावाचा त्रास होत होता. सुरुवातीला सामान्य समस्या समजून दुर्लक्ष करण्यात आले. मात्र, त्रास दिवसेंदिवस वाढत गेल्याने संबंधित महिलेने उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात धाव घेतली.
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील यांनी रुग्णाची सखोल तपासणी केली. सोनोग्राफीसह आवश्यक रक्ततपासण्या करण्यात आल्यानंतर महिलेच्या गर्भपिशवीमध्ये सुमारे २० बाय २० सेंटीमीटर आकाराची मोठी गाठ असल्याचे निदान झाले. याशिवाय गर्भपिशवीत इतर काही लहान गाठीदेखील असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.
गाठीचा आकार मोठा असल्याने तिचा आसपासच्या अवयवांवर दबाव निर्माण होत होता. त्यामुळे रुग्णाच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय वैद्यकीय पथकाने घेतला.
स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील आणि डॉ. ऐश्वर्या चलवदे यांच्या अनुभवी टीमने अत्यंत नियोजनबद्ध आणि काळजीपूर्वक शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेदरम्यान गर्भपिशवीतील तब्बल ३.५ किलो वजनाची मोठी गाठ यशस्वीपणे बाहेर काढण्यात आली. तसेच इतर लहान गाठींसह संपूर्ण गर्भपिशवीही सुरक्षितपणे काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा होत असून ती वैद्यकीय देखरेखीखाली उपचार घेत आहे.
याबाबत माहिती देताना डॉ. प्राजक्ता पाटील यांनी सांगितले की, महिलांनी पोटदुखी, पोट फुगणे, पोटात जडपणा, वारंवार दबाव जाणवणे किंवा असामान्य रक्तस्त्राव यांसारख्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अशा लक्षणांमागे गर्भपिशवीतील गाठीसारखे गंभीर कारण असू शकते. वेळेत तपासणी करून योग्य उपचार घेतल्यास मोठ्या शस्त्रक्रियाही यशस्वीपणे करता येतात आणि रुग्णाचे प्राण वाचविणे शक्य होते.



