


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । के. सी. ई. सोसायटी संचलित ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालयात स्वीडनमध्ये कार्यरत माजी विद्यार्थी तथा सॉफ्टवेअर अभियंता सच्चिदानंद पाटील आणि त्यांची कन्या श्रेयसी पाटील यांच्या प्रेरणादायी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना स्वीडनमधील आधुनिक शिक्षणपद्धती, जागतिक करिअरच्या संधी आणि तंत्रज्ञानाच्या बदलत्या जगाची माहिती मिळाली.
सन १९९४ ते १९९९ या कालावधीत ए. टी. झांबरे विद्यालयात शिक्षण घेतलेल्या सच्चिदानंद पाटील यांनी अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कारकीर्द घडवली. सध्या ते स्वीडनमधील गोथेनबर्ग येथे वास्तव्यास असून जागतिक कीर्तीच्या वोल्वो कार कंपनीत कार्यरत आहेत. सुट्टीनिमित्त भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या शाळेला भेट देत शिक्षकांचे आशीर्वाद घेत विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला.
यावेळी त्यांनी शिक्षणातील सातत्य, कठोर परिश्रम, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणताही विद्यार्थी जागतिक स्तरावर यश मिळवू शकतो, असा संदेश दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
श्रेयसी पाटील हिने स्वीडनमधील शालेय शिक्षण, डिजिटल अध्यापन, प्रकल्पाधारित शिक्षण, क्रीडा, सहशालेय उपक्रम आणि विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या स्वातंत्र्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी स्वीडनमधील शिक्षण, भाषा, संस्कृती आणि करिअरच्या संधींबाबत उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले.मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी माजी विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत हा संवाद विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती पूनम कोल्हे आणि विवेक मोरे यांनी केले. शेवटी सच्चिदानंद पाटील व श्रेयसी पाटील यांचा विद्यालयातर्फे सन्मान करण्यात आला.



