
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील व बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वडोदा गावात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट वाढत असून, या गैरकृत्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडले आहे. गावातील अनेक भागांत खुलेआम दारूची विक्री होत असल्याचे समोर आले असून, पोलीस प्रशासन या प्रकरणात निष्क्रिय असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात अवैध दारू विक्रीविरोधात आवाज उठवणाऱ्या नागरिकांना विक्रेत्यांकडून थेट धमक्या दिल्या जात आहेत. या भीतीच्या वातावरणामुळे नागरिक तोंड दाबून बुक्क्याने पिटत आहेत. काही नागरिकांनी सांगितले की, “दारू विक्रेते उघडपणे म्हणतात — आम्ही पोलिसांना हप्ता देतो, आमच्यावर काही होणार नाही.” हे वक्तव्य पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न निर्माण करणारे आहे.
वडोदा हे गाव विदर्भाच्या सीमेवरील महत्त्वाचे गाव असून, आसपासच्या खेड्यांमधील अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात. मात्र, गावात सुरू असलेल्या या अवैध व्यवसायामुळे विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना असुरक्षित वाटत आहे. अनेक वेळा दारूच्या नशेत असलेले लोक विद्यार्थ्यांना त्रास देतात, अशी तक्रारही पालकांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही, तर ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत.
या सर्व घडामोडींमुळे गावातील शांतता धोक्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने या अवैध दारू विक्रेत्यांविरोधात कारवाई करून गावात शांती व सुरक्षिततेचे वातावरण प्रस्थापित करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
गावात वाढत्या अवैध दारू विक्रीमुळे सामाजिक अधःपतन होत असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी त्वरित कार्यवाही ही काळाची गरज ठरली आहे.



