विराटच्या खेळीने भारताचा दणदणीत विजय

virat kohli

हैदराबाद वृत्तसंस्था । कर्णधार विराट कोहलीच्या वादळी खेळीच्या मदतीने भारताने विंडीज संघाला पहिल्या टि-२० सामन्यात नमवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात पाहुण्या विंडीजने भारतापुढे विजयासाठी २०८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यात सिमरॉन हेटमायर याने ४१ चेंडूंत २ चौकार आणि ४ खणखणीत षटकारांसह ५६ धावांची केलेली खेळी लक्षणीय ठरली. सलामीला आलेल्या एविन लुईसने १७ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांनिशी ४० धावा, ब्रँडन किंगने २३ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकारांनिशी ३१ धावा, किरॉन पोलार्डने १९ चेंडूंत १ चौकार आणि ४ षटकारांनिशी ३७ धावा तर जेसन होल्डरनं ९ चेंडूंत १ चौकार आणि २ षटकारांनिशी २४ धावा करत विंडीजची धावसंख्या २० षटकांत ५ बाद २०७ पर्यंत पोहोचवली.

विंडीजनं दिलेल्या २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पहिल्या तीन षटकांत बिनबाद २८ धावा केल्या. त्यानंतर चौथ्या षटकात दुसर्‍याच चेंडूवर सलामीवीर रोहित शर्मा ८ धावा करून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने लोकेश राहुलच्या मदतीने डाव सावरला. विराटने ५० चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने नाबाद ९४ धावा केल्या तर लोकेश राहुलने ४० चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांनिशी ६२ धावा काढल्या. यामुळे भारताने सहा गडी राखून विजय संपादन केला.

Protected Content