भारताला हॉकीत कांस्य पदक; जर्मनीला लोळविले !

टोकियो वृत्तसंस्था | उपांत्य फेरीत निराशाजनक कामगिरी करणार्‍या भारतीय पुरूष हॉकी संघाने जर्मनीला पराभूत करत कांस्य पदक पटकावले आहे. १९८० नंतर आपल्या संघाला मिळालेले हे पदक अतिशय लक्षणीय मानले जात आहे.

हॉकीच्या उपांत्य सामन्यात बेल्जीयमने भारताचा पराभव केल्याने देशभर नैराश्याचे वातावरण होते. मात्र तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने उज्ज्वल कामगिरी करत जर्मनीचा दणदणीत पराभव केला. सामन्यातील पूर्वाधात जर्मनीने जोरदार आक्रमण केले. दुसर्‍याच मिनिटाला गोल करून त्यांनी आघाडी घेतली. यानंतर सिमरजनीत याने गोल करून भारताला बरोबरीत नेले. यानंतर जर्मनीने दोन गोल केल्याने भारत ३-१ अशा पीछाडीवर गेला. यानंतर मात्र भारतीय संघाने जबरदस्त प्रदर्शन केले.

हार्दीक सिंग याने भारतातर्फे दुसरा गोल करून जर्मनीची आघाडी कमी केली. तर हरमनप्रीत याने गोल करून ३-३ अशी बरोबरी करून दिली. यानंतर रूपींदर आणि हरमनप्रीत यांच्या गोलमुळे भारताला ५-३ अशी चांगली आघाडी मिळाली. तिसर्‍या क्वॉर्टरच्या अखेरीस जर्मनीने जोरदार आक्रमण केले. त्यांना लागोपाठ तीन पेनल्टी कॉर्नरदेखील मिळाले. तथापि, भारताच्या अभेद्य बचाव फळीने याचा यशस्वी प्रतिकार केला. चौथ्या क्वॉर्टरच्या प्रारंभी जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतर त्यांनी गोल करून ५-४ अशी आगेकूच केली. शेवटच्या क्वॉर्टरमध्ये तीन मिनिटे उरलेली असतांना जर्मनीला कॉर्नर मिळाला. मात्र भारताने याचा यशस्वी बचाव केला. तर सहा सेकंद बाकी असतांनाही मिळालेला पेनल्टी कॉर्नर वाचवत भारताने आपल्या ऐतिहासीक विजयावर शिक्कामोर्तब केले. यामुळे भारताने ५-४ असा सामना जिंकला.

भारतीय पुरूष संघ हा हॉकीत कधी काळी अपराजीत मानला जात होता. मात्र काळाच्या ओघात अन्य देश पुढे आले. १९८० सालच्या मॉस्को ऑलिंपीकमध्ये भारताने शेवटचे सुवर्णपदक पटकावले होते. यानंतर पुढच्या म्हणजे लॉस एंजल्स येथील ऑलिंपीकमध्ये पाचव्या क्रमांकाचा अपवाद वगळता भारतीय संघाच्या पदरी नेहमीच निराशा पडली होती. या पार्श्‍वभूमिवर सध्याच्या टोकियो ऑलिंपीकमध्ये भारतीय संघाने अतिशय चमकदार कामगिरी करत कांस्य पदक पटकावले आहे. यामुळे आता भारतीय हॉकीला अच्छे दिन येतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जर्मनी हा अतिशय बलाढ्य असा संघ चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. या संघाने २००८ आणि २०१२ मध्ये सुवर्णपदक तर २०१६ साली कांस्य पदक मिळविले होते हे विशेष.

Protected Content