दोनदा अपहरण अपहरण झाल्याने २ महिन्यांच्या बाळाला २४ तास सुरक्षा !

 

 अहमदाबाद : वृत्तसंस्था । गुजरातमध्ये चक्क एका दोन महिन्याच्या बाळाला दिवस रात्र सुरक्षा पुरवण्यात आली आहे. गांधीनगरमधील अडलाज येथील या दोन महिन्याच्या बाळाचं दोनदा अपहरण झाल्याने ही सुरक्षा पुरवण्यात आलीय.

 

त्यामुळे हे बाळ २४X७ पोलीस सुरक्षा पुरवण्यात आलेली गुजरातमधील सर्वात तरुण व्यक्ती ठरल्याचं सांगितलं जातंय.

 

अडलाज त्रिमंदीर येथील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या या बाळाच्या पालकांनी सर्वात आधी एप्रिल महिन्यात त्यांचं दोन दिवसांचा बाळ चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती. मात्र नंतर या बाळाची अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका करण्यात आली. त्यानंतर पाच जून रोजी पुन्हा या बाळाचं अपहरण करण्यात आलं. दोन्ही वेळेस या बाळाचं अपहरण करणारे लोक हे संतती नसलेली जोडपीच निघाली हा सुद्धा एक योगायोगच म्हणावा लागेल. एकाच बाळाच्या अपहरणाचा दोनदा प्रयत्न झाल्याने पोलिसांनी एक विशेष गटाची स्थापना करुन झोपडपट्टी जवळच काही पोलीस कर्मचाऱ्यांना २४ तास तैनात केलं आहे. इतकच नाही तर पोलीस या बाळाचं पुन्हा अपहरण होऊ नये म्हणून त्याच्या पालकांना नवीन सुरक्षित ठिकाणी निवाऱ्याची सोय करता येईल का याबद्दलची विचार करत आहे. या बाळाचे पालक कचरा गोळा करण्याचं काम करतात.

गांधीनगरमधील स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक एच. पी. झाला यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस या मुलाच्या पालकांसाठी चांगला रोजगार आणि निवाऱ्याची सोय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. “बाळाला सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस खातं पालकांसाठी नोकरी आणि घराच्या शोधात आहे,” अश झाला यांनी सांगितलं. “आम्ही या बाळावर आणि त्याच्या पालकांवर सतत लक्ष ठेऊन आहोत. पालक कामावर आहेत की घरी याकडे पोलिसांचं लक्ष आहे. या बाळाच्या आईकडे काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे क्रमांक देण्यात आलेत. आत्पकालीन स्थितीमध्ये गरज पडल्यास तातडीने फोन करुन मदत मागता यावी म्हणून त्यांना हे क्रमांक देण्यात आलेत,” असंही झाला म्हणाले.

 

हे बाळ दोन दिवसांचं असताना बनासकांता येथून जिग्नेश आणि अस्मिता भारती यांनी या बाळाचं अपहरण केलं होतं. मेहसाणा जिल्ह्यातील कादी येथे राहणाऱ्या जिग्नेश आणि भारती यांना मुल होत नसल्याने त्यांनी गांधीनगरमधील सरकारी रुग्णालयातून बाळ चोरलं होतं. एका आठवड्यामध्ये पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला होता.

 

त्यानंतर पाच जून रोजी बनानसवाडा येथील एका दांपत्याने या बाळाचं अपहरण केलं होतं. दोन महिन्यात या बाळाचं दुसऱ्यांदा अपहरण झालं. यावेली दिनेश आणि सुधा कटारा यांनी हे बाळ पळवून नेलं होतं. सात वर्षानंतरही अपत्य होत नसल्याने या दोघांनी बाळ चोरलं होतं. या बाळाची आई बाळाला ठेऊन कचरा गोळा करण्यासाठी गेल्याचं पाहून दिनेशने बाईकवरुन येत या बाळाला त्याच्या आईच्या न कळत घेऊन गेला होता. पोलिसांनी जवळजवळ ७०० सीसीटीव्ही कॅमेरांमधील फुटेज तपासून पाहिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना राजस्थानमधून अटक केली. यासाठी पोलिसांनी गांधीनगर, मेहसाणा, अरवली आणि सबरकांता जिल्ह्यांमध्ये तपास केला.

 

अशाप्रकारे अपहरण होण्याची शक्यता असणारी अनेक लहान मुलं त्यांच्या पालकांसोबत रस्त्याच्या बाजूला अथवा फुटपाथवर राहतात. अपहरणकर्त्यांसाठी या मुलांना उचलून नेणं सहज शक्य असतं. या प्रकरणामधून धडा घेऊन आम्ही अशा इतर मुलांच्या सुरक्षेसाठीही पावलं उचलत आहोत, असं अन्य एका पोलिसाने सांगितलं.

 

Protected Content