जिल्ह्यातील महिलांमध्ये जागृतीसाठी उद्यापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

जळगाव, प्रतिनिधी । जागतिक महिला दिनानिमित्ताने जळगाव जिल्हा महिला असोसिएशनतर्फे जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने १ ते १५ मार्च दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमार बाल्दी यांनी  पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा महिला असोसिएशनतर्फे रविवार दि. १ रोजी कांताई सभागृहात राज्यस्तरीय जात पंचायत विरोधी परिषद, यु ट्युबवरील वाढलेली अश्लिल व्हीडीओ तसेच पोर्न साईट्सवर प्रतिबंध घालण्यात यावे यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सहयोगी म्हणून सर्वधर्म समभाव महिला मंडळ आहे. तर बुधवार दि. ४ रोजी महिला सशक्ती करणासाठी मोटरसाकल रॅली आयोजित करण्यात आली आहे. तेरापंथी जैन महिला मंडळातर्फे देशात एकाच वेळी ४३६ ठिकाणी ही मोटारसाकल रॅली होत असून या रॅलीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. रॅली सर्वांसाठी खुली असून नोंदणीकृत वाहन व ड्रायव्हिंग लायसन्स अनिवार्य करण्यात आले आहे. रविवार दि. ८ रोजी सकाळी ५:३० वाजता मॅरेथॉन, झुंबा नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. पिंकेथॉन गृप व वूमेनिया गृपच्या संयुक्त विद्यमाने नृत्य स्पर्धा होईल. याच दिवशी दुपारी पथनाट्य स्पर्धा, पारंपारिक होळी नृत्य स्पर्धा, ४ वाजता व्याख्यान व पुरस्कार वितरण होईल. व्याखानात ‘सायबर लॉ’ विषयी तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तर रविवार दि. १५ रोजी शिरसोली येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. संपुर्ण कार्यक्रमात विविध महिला मंडळ सहभागी होणार असल्याचे असोसिएशनच्या अध्यक्षा राजकुमार बाल्दी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी रत्ना झवंर, निर्मला जोशी, निर्मला छाजेड, मिनाक्षी वाणी, वासंती दिघे आदी पस्थित होते.

Protected Content