Home Cities पाचोरा घरासमोरील अतिक्रमणाविरोधात आमरण उपोषण ; आश्वासनानंतर दुसऱ्याच दिवशी उपोषण मागे

घरासमोरील अतिक्रमणाविरोधात आमरण उपोषण ; आश्वासनानंतर दुसऱ्याच दिवशी उपोषण मागे

0
10


पाचोरा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा येथे घरासमोरील कथित अनधिकृत अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी असलम फतरु तडवी यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले बेमुदत आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या आश्वासनानंतर दुसऱ्या दिवशी मागे घेतले. ग्रामपंचायतीने एका ठिकाणचे तार कंपाऊंड हटविले असून, उर्वरित बांधकामांचे मोजमाप करून येत्या आठ दिवसांत रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तडवी यांनी उपोषण सोडले.

पिंपळगाव हरेश्वर येथील तडवी समाज बांधवांच्या घरासमोर गेल्या दोन वर्षांपासून गावातील काही व्यक्तींनी तार कंपाऊंड तसेच बांधकाम केल्याचा आरोप असलम तडवी यांनी केला होता. या अतिक्रमणामुळे घरातून बाहेर पडण्यासाठी तसेच ये-जा करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार लेखी आणि तोंडी तक्रारी करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.असलम तडवी यांनी ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले. घरासमोरील अतिक्रमण तातडीने हटवून ये-जा करण्यासाठी रस्ता मोकळा करून द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी होती. उपोषणाला त्यांच्या कुटुंबीयांसह विविध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनीही पाठिंबा दिला. उपोषणस्थळी गटविकास अधिकारी अंजने आणि अमोल पाटील यांनी भेट देऊन उपोषण सोडण्याबाबत चर्चा केली. मात्र, घरासमोरील बांधकाम आणि अतिक्रमणाचा प्रश्न ठोसपणे मार्गी लागेपर्यंत उपोषण मागे घेण्यास असलम तडवी यांनी नकार दिला. त्यामुळे पहिल्या दिवशी उपोषण सुरूच राहिले. दरम्यान, ८ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतीने संबंधित ठिकाणी कारवाई करत बाळू मेटे यांनी केलेले तार कंपाऊंड काढून टाकले. तसेच इतर चार जणांच्या सुरू असलेल्या बांधकामाचे मोजमाप करण्यात आले. संबंधित बांधकामांची पाहणी करून येत्या आठ दिवसांत रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले. प्रशासन आणि ग्रामपंचायतीच्या या आश्वासनानंतर असलम तडवी यांनी दुसऱ्या दिवशी आपले बेमुदत आमरण उपोषण मागे घेतले. उपोषण सोडविण्यासाठी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष विनोद तावडे यांनी विशेष पुढाकार घेतला. प्रशासन, ग्रामपंचायत आणि आंदोलक यांच्यात समन्वय साधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

या उपोषणाला रजिया फतरु तडवी, अमर फतरु तडवी, शाहरुख फतरु तडवी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल लोंढे, अमित तडवी, तालुकाध्यक्ष संदीप तडवी, एकलव्य वंचित आघाडीचे अनेश तडवी, मनोज अहिरे, जनार्दन सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असल्याचा दावा करण्यात आलेल्या या अतिक्रमणाच्या प्रश्नावर अखेर ग्रामपंचायतीने एका ठिकाणी कारवाई केली असून, उर्वरित बांधकामांबाबत आठ दिवसांत रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या मुदतीत प्रत्यक्षात कितपत कार्यवाही होते, याकडे आता पिंपळगाव हरेश्वर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound