Home Cities जळगाव जळगाव जिल्ह्यात ‘प्रतिबंधात्मक ऑपरेशन ३०५’; पोलिसांची अवैध धंदे आणि गुन्हेगारीविरोधात धडक कारवाई

जळगाव जिल्ह्यात ‘प्रतिबंधात्मक ऑपरेशन ३०५’; पोलिसांची अवैध धंदे आणि गुन्हेगारीविरोधात धडक कारवाई

0
6


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील प्रॉपर्टीविषयक गुन्ह्यांना आळा घालण्यासह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलिसांनी एकाच वेळी विशेष मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात ‘प्रतिबंधात्मक ऑपरेशन ३०५’ राबवून रेकॉर्डवरील आरोपी, संशयित वाहने, भंगार दुकाने आणि संशयित ठिकाणांची तपासणी करण्यात आली.

भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३०५ अंतर्गत इमारत, तंबू किंवा नौकेत केलेली चोरी, वाहतुकीच्या साधनांची चोरी, वाहतुकीच्या साधनातून किंवा त्यावरील मालाची चोरी, उपासनेच्या ठिकाणी चोरी तसेच शासन किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या मालमत्तेची चोरी यासंदर्भात शिक्षेची तरतूद आहे. या गुन्ह्यासाठी सात वर्षांपर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद असून हा गुन्हा दखलपात्र व अजामीनपात्र आहे. विशेष मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत १५७ भंगार दुकानांची तपासणी, २८१ रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी आणि ७४२ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेतील संबंधित कलमांनुसार प्रतिबंधात्मक कारवाई, २३ NBW वॉरंटची बजावणी आणि ५ आरोपींची तपासणी करण्यात आली. प्रॉपर्टीविषयक गुन्ह्यांमध्ये चोरीच्या मुद्देमालाची विल्हेवाट भंगार दुकानांमार्फत लावली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी भंगार दुकाने आणि संशयित ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केले. याशिवाय गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवरही पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

अवैध धंद्यांविरोधातही पोलिसांनी कारवाईचा धडाका कायम ठेवला. दारूबंदी कायद्यान्वये ३६ गुन्हे दाखल करून ७३८ लिटर गावठी दारू आणि ६१३० लिटर कच्चे रसायन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख ७८ हजार ४५ रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच देशी, विदेशी दारू व बिअरच्या १६४ बाटल्या जप्त करण्यात आल्या. आर्म्स अॅक्टअंतर्गत एक गुन्हा दाखल करून एक कोयता जप्त करण्यात आला. त्याची किंमत २०० रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच अवैध वाळू वाहतुकीविरोधातही कारवाई करत एक डंपर आणि १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली. या मुद्देमालाची किंमत सुमारे १० लाख ६० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या विशेष मोहिमेद्वारे प्रॉपर्टीविषयक गुन्हे, अवैध दारू, अमली पदार्थ, अवैध शस्त्रे आणि अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर सातत्याने लक्ष ठेवण्यासह संशयास्पद हालचालींवरही पोलिसांची नजर राहणार आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी नागरिकांना आपल्या मालमत्तेची, वाहनांची आणि मौल्यवान वस्तूंची योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. चोरीचा किंवा संशयास्पद मुद्देमाल खरेदी-विक्री करणाऱ्या व्यक्तींबाबत माहिती असल्यास पोलिसांना कळवावे, असेही त्यांनी सांगितले.

अवैध धंदे, अमली पदार्थ, अवैध शस्त्रे, अवैध दारू तसेच अवैध वाळू वाहतुकीबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहनही पोलीस अधीक्षकांनी केले. ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत (जळगाव) आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते (चाळीसगाव) यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांनी या मोहिमेत सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी बजावली.


Protected Content

Play sound