Home प्रशासन कुऱ्हा काकोड्यात डेंग्यूचा धोका ; प्रशासन झोपेत की जागे? तातडीने फवारणीची मागणी

कुऱ्हा काकोड्यात डेंग्यूचा धोका ; प्रशासन झोपेत की जागे? तातडीने फवारणीची मागणी

0
19


मुक्ताईनगर -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर येथे डेंग्यूची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. संभाव्य फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गावातील विविध भागांत डासांची वाढ, साचलेले पाणी आणि अस्वच्छतेची परिस्थिती असल्यास डेंग्यूच्या प्रसाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागाने गावातील परिस्थितीची तातडीने पाहणी करून डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. डेंग्यूचा संभाव्य प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक त्या ठिकाणी औषध फवारणी आणि धूर फवारणी करण्यात यावी, तसेच साचलेल्या पाण्याचा निचरा करून परिसराची स्वच्छता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी नियमित स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष गावात उतरून उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी संबंधित विभागांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. दरम्यान, डेंग्यूचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनीही घराभोवती पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. ताप, डोकेदुखी, अंगदुखी यांसारखी लक्षणे जाणवल्यास विलंब न करता वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound