पाचोऱ्यात प्रभू श्रीरामचंद्रांच्या साक्षीने ना. एकनाथ शिंदेंनी फुंकले निवडणुकांचे रणशिंग

पाचोरा प्रतिनिधी । राज्याचे नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी आज पाचोऱ्यात धावता दौरा केला. अत्यंत गुप्तपणे झालेल्या या दौऱ्यात त्यांनी पाचोरा व भडगाव नगर परिषद अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेत आगामी पालिकेच्या राजकारणाची माहिती आ. किशोर पाटील यांचे कडून जाणून घेतली. जळगाव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून पाचोरा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी करावयाच्या रणनीती बाबत त्यांनी गुप्तगू केली. शहरातील कृष्णापुरी भागातील प्रभू श्रीराम यांच्या साक्षीने आगामी नगरपालिका निवडणुकांचे जणू त्यांनी रणशिंग फुंकले.

या दौऱ्याबाबत अंत्यत गुप्तता पाळल्याने याची माहिती प्रमुख कार्यकर्त्यांनासह माध्यम प्रतिनिधींना देखील नव्हती. त्यामुळे या भेटीची पाचोरा शहरासह जिल्ह्यात वेगवेगळी चर्चा रंगली होती.

दरम्यान पाचोरा शहरातील प्रभू श्रीराम मंदिर परिसरात झालेल्या या बैठकीस ना. एकनाथ शिंदे यांचेसह केवळ आ. किशोर पाटील, मुकूंद बिल्दीकर, व नगराध्यक्ष संजय गोहिल हे चारच जण उपस्थित होते. याबैठकीत अनेक खलबते झाल्याची माहिती आहे. पालिकेअंतर्गत नगरविकास विभागाकडे प्रस्तावित असलेल्या कामांची त्यांनी माहिती घेत तात्काळ सर्व विषय मार्गी लावणार असल्याचे नियोजन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही तालुक्यावर विशेष लक्ष केंद्रित करत तेथे करावयाच्या नियोजनाची जबाबदारी ना. एकनाथ शिंदे यांचेवर सोपवली असल्याने त्यांनी अशा प्रकारे गुप्त दौऱ्यांची सुरुवात पाचोऱ्यातून केल्याची माहिती समोर आली आहे.

 

Protected Content