चाळीसगावात मुलींना शाळेतच मिळणार पास

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने पासेसमुळे त्यांची गैरसोय होते. ही गंभीर बाब लक्षात येताच, आगार व्यवस्थापकांनी नवीन उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत आता मुलींना थेट त्यांच्या शाळांमध्ये पास वितरित केले जाणार आहे.

चाळीसगाव तालुक्यातील सर्व सामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे, म्हणून राज्य परिवहन महामंडळ आगाराकडून विद्यार्थिनींना मानव विकास व अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मोफत पासेस वाटप केले जातात. मात्र विद्यार्थ्यांना पासेससाठी बस स्थानकावर अनेक चकरा माराव्या लागत असल्याने त्यांची गैरसोय होते. हि गंभीर स्वरूपाची बाब लक्षात येताच चाळीसगावाचे आगारा प्रमुख संदिप निकम यांनी एका अनोख्या उपक्रमाला सुरुवात केली आहे.

या उपक्रमाअंतर्गत मुलींना पासेस हे थेट त्यांच्या शाळेत जाऊन वाटप करण्यात येत आहे. अद्यापपर्यंत तालुक्यातील विविध शाळेत जाऊन आगार प्रमुख संदिप निकम यांनी एकूण ८९२ पासेस वितरीत केले आहेत. यात प्रामुख्याने तालुक्यातील डेराबर्डी, शिरसगाव, पिंपळगाव म्हाळसा, उंबरखेड, राष्ट्रीय विद्यालय चाळीसगाव, ए.बी.हायस्कुल चाळीसगाव व जयहिंद विद्यालय आदी शाळेत मानव विकास व अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत मुलींना मोफत पासेस वाटप करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना पासेससाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागत असल्याने या अनोख्या उपक्रमाला सुरुवात करण्यात आल्याचे आगार प्रमुख संदिप निकम यांनी सांगितले. तत्पूर्वी विभाग नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, यंत्र अभियंता श्रावण सोनवणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आगार प्रमुख संदिप निकम यांनी सदर उपक्रमाला सुरुवात केली आहे. याबाबत आगार प्रमुख संदिप निकम यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 

Protected Content