लग्न अनावश्यक म्हणाल्याने मलालावर कट्टरतावादी संतापले

 

इस्लामाबाद: वृत्तसंस्था ।  नोबेल पुरस्कार विजेत्या मलाला युसूफजाईने लग्न ही अनावश्यक बाब असल्याचे सांगितल्यामुळे  पाकिस्तानातील कट्टरतावादी तिच्यावर संतापले आहेत

 

मलालाने विवाहाबाबत केलेल्या  वक्तव्यामुळे पाकिस्तानमध्ये गदारोळ सुरू आहे. मलालाच्या वक्तव्यामुळे कट्टरतावादी संतापले आहेत. प्रसिद्ध फॅशन मॅगझीन ‘व्होग’ला दिलेल्या मुलाखतीत मलालाने विवाह आणि पार्टनरशिपसारख्या मुद्यांवर बेधडक मते व्यक्त केली. या मुद्याला घेऊन पाकिस्तानमधील कट्टरतावादी मौलाना संतापले आहेत. व्होगने मलालाच्या मुलाखतीला जुलै महिन्याच्या अंकासाठी कव्हर स्टोरी केली आहे.

 

‘व्होग’ची पत्रकार सीरीन केल यांना दिलेल्या मुलाखतीत मलालाने लग्नाला अनावश्यक म्हटले. लोकांना जीवनसाथी हवा असेल तर तुम्ही कागदावर स्वाक्षरी का करता, ही एक परस्पर सहमतीने केलेली भागिदारी का असू शकत नाही, असा प्रश्न मलालाने उपस्थित केला. त्यानंतर पाकिस्तानमधून मलालावर टीका सुरू झाली आहे.

 

पाकिस्तानमध्ये मलालाच्या या वक्तव्याचे पडसाद उमटले आहे. मलालाचे वडील जियाउद्दीन युसूफजाई यांना स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. त्यांनी सांगितले की, मलालाचे वक्तव्य तोडून सादर केले जात आहे. अनेक मौलानांनी ट्विट करून मलालाच्या वडिलांकडून याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. यामध्ये पेशावरचे कासीम अली खान मशिदीचे इमाम मुफ्ती पोपलजईदेखील सहभागी होते.

 

पाकिस्तानमध्ये मलालाच्या मुलाखतीचा एकच भाग व्हायरल केला जात आहे. व्हायरल होणाऱ्या मुलाखतीच्या या एका भागामुळे कट्टरतावादी विचारधारेचे लोक चिडले आहेत. या मुलाखतीत सीरिन केलने मलालाला प्रेम संबंधावर प्रश्न विचारला होता. तिने हा प्रश्न टाळला. मुलाखत संपल्यानंतर मलालाने या विषयावर मत व्यक्त करताना म्हटले की, सर्व मित्रांना जोडीदार मिळत आहेत. मात्र, या मुद्यावर मी गोंधळलेली आहे.

 

मलालाने आपल्या आई-वडिलांचा विवाह अरेंज्ड लव्ह मॅरेज असं म्हटले. तिने म्हटले की, दोघे एकमेकांना आवडत होते. त्यांचा विवाह घरातील मंडळींनी सहमती दर्शवल्यानंतर झाला. तर, मलालाच्या आईने तिच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली. त्यांनी म्हटले की, लग्न एक सुंदर नातं आहे. त्यामुळे मलालाला  लग्न करण्याची आवश्यकता आहे.

 

 

Protected Content