आ. किशोर पाटील यांचे उद्या वीज वितरणच्या कार्यालयांना ताला ठोको आंदोलन !

पाचोरा प्रतिनिधी । वीज वितरण कंपनीतर्फे शेतकर्‍यांचे मीटरची जोडणी बंद करण्यासह सक्तीची वसुली करण्यात येत असल्याचा आरोप करून आ. किशोर पाटील हे उद्या आपल्या मतदारसंघात वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना ताला ठोको आंदोलन करणार आहेत.

सध्या खरीप हंगाम तोंडावर असतांना शेतकर्‍यांना वीज विषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने पाचोरा-भडगाव मतदारसंघातील शेतकर्‍यांच्या समस्यांवरून आमदार किशोरआप्पा पाटील यांनी आधीच आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वीज वितरण कंपनीने सक्तीची वसुली न थांबविल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या अनुषंगाने सोमवार दिनांक ७ जून रोजी ते ताला ठोको आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनाच्या अंतर्गत पाचोरा-भडगाव मतदारसंघातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयांना कुलूप लावण्यात येणार असल्याची माहिती आमदार किशोरआप्पा पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून जाहीर केली आहे.

जुन महिना हा शेकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा महिना असून या महिन्यात अत्यल्प पाणी असल्यावरही शेतकरी जिवाचे रान करुन ठिबकद्वारे कापूस पिक घेण्यासाठी प्रयत्नशील असतो. तसेच शेतकऱ्यांना रात्री बे रात्री ठराविक कालावधी करिता  विद्यूत पुरवठा केला जातो. तो देखील  सुरळीत नसतो. कधी कधी तर कमी दाबाने विद्यूत पुरवठा होत असल्याने शेतीपंप चालत नाहीत व सतत पुरवठा खंडित होत असल्याने विद्यूतपंप जळण्याच्या घटना घडतात. याच महत्वाच्या दिवसात शेती कामे खोळंबली तर शेतकऱ्यांच्या बारा महिन्यांच्या हंगाम हातचा जाऊन स्वप्नांचा चुराडा होतो. याचे एकमेव कारण म्हणजे विद्यूत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार. विद्यूत वितरण कंपनीचे अधिकारी स्वत: चोवीस तास पंख्याखाली बसून कर्मचाऱ्यांच्या भरवशावर बसून असतात. एकही कर्मचारी मुख्यालयात रहात नाही. या कारणांमुळे शेतकऱ्यांचा मानसिक छळ व आर्थिक नुकसान होते म्हणून ही समस्या वारंवार सांगूनही विद्यूत वितरण कंपनी लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी विज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत गेल्या मंगळवारी बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ५ दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. मात्र याबाबत विज वितरण कंपनीने कुठलीच दखल न घेतल्याने उद्या सोमवार दि. ७ जुन रोजी सकाळी ११ महावितरण कंपनीचा निषेध करत ताला ठोको आंदोलन करण्यात येणार आहे.

Protected Content