नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

जळगाव, प्रतिनिधी ।  नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून बँकर्स मिट तसेच आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मंगळवार दि. १२ जुलै रोजी  जिल्हा बँकेच्या गणेश कॉलनी येथील प्रशिक्षण हॉलमध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्‌घाटन रिजनल मॅनेजर अरुण मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी झाडाचे रोप देवून स्वागत केले. तसेच जिल्हा बँकेच्या वतीने नाबार्डच्या वर्धापनदिनानिमित्त नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे प्रास्ताविक श्रीकांत झांबरे यांनी केले. यानंतर कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांनी आर्थिक साक्षरता व डिजीटल सेवांची गरज व त्या ग्राहकांना सहज उपलब्ध होण्यासाठी बँकेने केलेले प्रयत्न व बँकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी श्रीकांत झांबरे यांनी स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. तसेच नाबार्डच्या शेतीविषयक व शेतीपूरक व्यवसायांना कमी व्याजदरातील योजनांविषयी माहिती दिली. याप्रसंगी कृषी विभागाचे सहसंचालक अनिल भोकरे, विविध बँकांचे जिल्ह्यातील रिजनल मॅनेजर, सीईओ, कर्मचारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर्थिक साक्षरता मेळाव्याच्या प्रसंगी जिल्हा बँकेतर्फे आर्थिक साक्षरता व डिजीटल साक्षरता अंतर्गत पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. यानंतर अध्यक्षीय भाषणात श्री.मिश्रा यांनी शेती व शेतीपूरक योजनांविषयी सर्व बँकांनी ग्राहकांना माहिती द्यावी, असे सांगितले. श्रीकांत झांबरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

 

Protected Content