न्यूज पोर्टल्स व ओटीटी मंच आता माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या कक्षेत !

नवी दिल्ली । गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले असून आता देशभरातील डिजीटल माध्यमे तसेच ओटीटी मंच हे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार आहेत. आज सकाळी याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

देशभरात डिजीटल मीडिया हा मोठ्या प्रमाणात वापरला जात असला तरी यावर नेमके कुणाचे नियंत्रण नसल्याची बाब अनेकदा अधोरेखीत करण्यात आली होती. वृत्तपत्र व अन्य मुद्रीत माध्यमांसाठी आरएनआय नोंदणी अनिवार्य असतांना डिजीटल मीडियासाठी देखील याच प्रकारचे धोरण असावे अशी मागणी कधीपासूनच करण्यात येत होती. यासाठी केंद्र सरकारने लोकांकडून सूचना देखील मागविल्या होत्या. या अनुषंगाने आज सकाळी एक नोटिफिकेशन काढण्यात आले आहे.

यात देशभरात ऑनलाईन सेवेच्या माध्यमातून स्ट्रीमिंग करण्यात येणारे ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट म्हणजेच ओटीटी सर्व्हीस आणि न्यूज व करंट अफेयर्स या प्रकारातील डिजीटल माध्यमे यांचे नियंत्रण आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणार असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे.

आता, माहिती व प्रसारण मंत्रालय ओटीटी प्लॅटफॉर्म्स व विविध न्यूज पोर्टल्सवरील माहितीचे नियंत्रण कसे करणार ? याबाबतची नोंदणी प्रक्रिया कशी असेल याच्या माहितीबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. याबाबत लवकरच धोरण जाहीर होणार असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे.

Protected Content