यावल बाजार समितीचा महत्त्वाचा निर्णय : वाहन भूईकाटा शुल्क माफ

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून यावल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या लिलावासाठी बाजार समितीत आलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांना भूईकाटा शुल्क माफ करण्याचा निर्णय आज झालेल्या मासिक सभेत घेण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, त्यांच्या शेतीमालाच्या विक्रीत अधिक सुलभता येणार आहे.

अंमलबजावणी १ एप्रिलपासून
आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या मासिक बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. यावेळी उपसभापती दगडू जनार्दन कोळी यांच्यासह संचालक मंडळातील सर्व सदस्य उपस्थित होते. यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या वाहनांच्या प्रकारानुसार ३० ते १०० रुपये शुल्क द्यावे लागत होते. मात्र, आता हे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. हा निर्णय येत्या १ एप्रिल २०२५ पासून अंमलात येणार आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
यावल बाजार समितीत अनेक शेतकरी दररोज आपला माल विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, मालाच्या मोजमाप आणि लिलाव प्रक्रियेत त्यांना विविध प्रकारचे शुल्क भरावे लागत होते. या शुल्कामुळे त्यांना आर्थिक भार सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर, बाजार समितीने शेतकऱ्यांचा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी आणि त्यांना बाजारपेठेत अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

शेतमाल विक्रीसाठी प्रोत्साहन
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी घेतलेल्या या निर्णयामुळे जास्तीत जास्त शेतकरी आपला शेतीमाल बाजार समितीत विक्रीस आणतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही आणि बाजारपेठेत अधिक पारदर्शकता निर्माण होईल.

यासंदर्भात माहिती देताना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे. शेतमालाचे मोजमाप आणि इतर खर्चामुळे शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार येतो. त्यामुळे त्यांची आर्थिक बचत व्हावी आणि त्यांना अधिक फायदेशीर बाजारपेठ उपलब्ध व्हावी, हाच आमचा उद्देश आहे.”

शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त
या निर्णयामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. “बाजार समितीच्या निर्णयामुळे आमच्या उत्पन्नात थोडा का होईना, पण दिलासा मिळणार आहे,” असे मत काही स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.

Protected Content