स्कुटर कंपनीचा प्रतिनिधी भासवत एकास २५ हजार रुपयात गंडविले

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | इलेक्ट्रीक स्कुटर कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगुन बुक केलेल्या स्कुटरचे अॅडव्हास मागत पाचोऱ्यातील एकास २५ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार समोर आला असून फसवणूक झालेल्या इसमाच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, “शहरातील संभाजी नगर भागातील रहिवाशी श्रीकांतगीर कैलासगीर गोसावी (वय – ३२) यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या व्हाट्सअप क्रमांकावर ओला इलेक्ट्रीक मोबॅलिटी प्रा. लि. या कंपनीचा लोगो असलेली एक लिंक पाठविण्यात आली. श्रीकांतगीर गोसावी यांनी सदरची लिंक ओपन करुन त्यात इलेक्ट्रीक स्कुटर बुक केली.

दरम्यान श्रीकांतगीर गोसावी यांना ९७३३०८६६३८ या मोबाईल क्रमांकावरुन फोन आला असता समोरच्या व्यक्तीने मी कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगुन तुमची स्कुटर बुक झाली आहे‌. तुम्ही माझ्या या मोबाईल क्रमांकावर गुगल पे द्वारे २५ हजार रुपये पाठवा. श्रीकांतगीर गोसावी यांनी क्षणाचाही विचार न करता २५ हजार रुपये पाठविले. काही वेळाने श्रीकांतगीर गोसावी यांना पुन्हा फोन आल्यावर समोरच्या व्यक्तीने पुन्हा १४ हजार ९०० रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र यावेळी श्रीकांतगीर गोसावी यांना संशय आला. व त्यांनी पाठवतो म्हणून सांगितले.

श्रीकांतगीर गोसावी यांनी शहानिशा करण्यासाठी कंपनीच्या कस्टमर केअर नंबरवर फोन करुन चौकशी केली असता कंपनीला २५ हजार रुपये मिळाले नसल्याचे सांगितल्यावर श्रीकांतगीर गोसावी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाचोरा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मंगलसिंग गायकवाड हे करीत आहे.

Protected Content