तिघा मुलांसह महिलेचा नदीत बुडून मृत्यू

अमरावती । जिल्ह्यातील निंभोरा राज (ता. धामणगाव) येथील तीन चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात एक महिला देखील मृत्यूमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

धामणगाव तालुक्यातील निंभोरा राज येथील चंद्रभागा नदी पात्रात बुडून तीन मुले आणि मातेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे. निंभोरा राज येथील पुष्पा चवरे यांनी आज एकादशी निमित्त पूजा केली होती. पुजेचे साहित्य पाण्यात अर्पण करण्याकरीता पुष्पा या आपल्या मुलांसोबत गावाशेजारच्या चंद्रभागा नदीवर गेल्या होत्या. त्यावेळी तीनही मुले अंघोळीसाठी नदी पात्रात उतरली. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या मुख्य प्रवाहात गेली आणि नदी पात्रातील खड्ड्यामध्ये बुडाली. त्यांना वाचविण्यासाठी पुष्पा चवरे या नदी पात्रात उतरल्या, मात्र त्यांचाही बुडून मृत्यू झाला आहे. यात यश प्रमोद चवरे (११), जीवन प्रदीप चवरे (१५), सोहम दिनेश झेले (१२), असे मृत चिमुकल्यांचे व पुष्पा दिलीप चवरे (३२), असे मृत महिलेचे नाव आहे. तर, बेबी प्रदीप चवरे (३५), राधा गोपाळराव मलीये (३८) यांची प्रकृती चिंताजनक आहे.

ही घटना घडली त्यावेळी नदीपात्रावर उपस्थित असलेल्या इतर दोन महिलांनी या चौघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपयश आले. यामध्ये त्या दोन्ही महिला अत्यवस्थ झाल्या आहेत. यातील एका महिलेला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर अन्य एका महिलेवर धामणगाव रेल्वे येथील शासकीय रुग्णालयत उपचार सुरू आहेत.

निभोरा गावाच्या बाजूनेच समृद्धी महामार्ग जात आहे. या मार्गाच्या कामासाठी नदीत अवैधरित्या खोलीकरण करण्यात आले आहे. नदीच्या पात्रात मोठे खड्डे पडले आहेत. मात्र, नदीच्या पात्रात प्रचंड पाणी असल्याने हे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे या खड्ड्यात बुडून माय लेकरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे.

Protected Content