Home क्राईम पोलिसांची संयुक्त कारवाई ; ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त, दोन आरोपी अटकेत

पोलिसांची संयुक्त कारवाई ; ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन जप्त, दोन आरोपी अटकेत

0
10

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात अंमली पदार्थांच्या अवैध विक्री व वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि जिल्हापेठ पोलीस ठाण्याने संयुक्तपणे मोठी कारवाई करत ५६.२९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त केले आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, अंमली पदार्थासह मोटारसायकल असा एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध साखळीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी ‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आपल्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे सातत्याने विशेष मोहिमा राबविण्याचे निर्देश दिले होते. १० जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३५ वाजता वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ काही व्यक्ती मेफेड्रोनची विक्री करण्यासाठी येणार आहेत. या माहितीची खातरजमा करून एलसीबी आणि जिल्हापेठ पोलिसांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी सापळा रचला. कारवाईदरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या तीन संशयितांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यापैकी एक संशयित अंधाराचा फायदा घेत पसार झाला. उर्वरित दोघांना ताब्यात घेऊन त्यांची कायदेशीर झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ५६.२९ ग्रॅम वजनाचा सुमारे २ लाख ८१ हजार ५४० रुपये किमतीचा मेफेड्रोन (एमडी) तसेच २५ हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर (एमएच-१९-डीजे-०१३२) मोटारसायकल जप्त करण्यात आली. अशाप्रकारे एकूण ३ लाख ६ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

या प्रकरणी जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरीओम नगर, मोहन टॉकीजजवळ, जळगाव) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३९, रा. कांचन नगर, जळगाव) या दोघांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक चौकशीत आरोपींनी फरार आरोपी भैय्या सोनवणे (रा. कांचन नगर, जळगाव) याच्याकडून विक्रीसाठी मेफेड्रोन घेतल्याची कबुली दिली असून, त्याचा शोध स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जयेश तायडे याच्याविरुद्ध यापूर्वीही खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, गंभीर दुखापत आणि दरोड्यासारख्या विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याचा गुन्हेगारी इतिहासही पोलिसांकडून तपासला जात आहे.

या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीतील इतर संबंधितांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली.


Protected Content

Play sound