पाचोरा शहरात गावठी दारू विक्रेता जेरबंद

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात शहरात एकाला गावठी दारू विक्री करतांना अटक करण्यात आली आहे.

(Image Credit Source: Live Trends News )

जळगाव जिल्हा सर्वत्र गावठी दारू विरोधात धडक मोहीम सुरू असून यामध्ये पाचोरा तालुक्यात देखील गावठी हातभट्टी विक्री व निर्मिती करणार्‍या विरोधात कारवाईचे धाडसत्र सुरू आहे. यामध्ये पाचोरा शहरातील भारत डेअरी बस स्टॉप जवळ एका गावठी दारू विक्रेत्याविरोधात पाचोरा दारूबंदी विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील यांना शरद शेलार हा अवैधरित्या गावठी दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

दरम्यान, या अनुषंगाने विलास पाटील व त्यांच्या पथकाने भारत डेअरी स्टाप जवळील शरद शेलार याचे दुकानावर छापा टाकला असता त्याचे ताब्यातील २ हजार १६० रुपये किंमतीची तयार पोटलीतील ४० लिटर गावठी असा मुद्देमाल जप्त करत शरद शेलार याचे विरुध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ नुसार कारवाई केली आहे.

सदरची कारवाई पाचोरा येथील दारूबंदी विभागाचे दुय्यम निबंधक विलास पाटील, पोलीस कर्मचारी गिरीश पाटील तसेच नंदू पवार यांनी केली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात अवैधरित्या दारु विक्री करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. तसेच यापुढे ही असेच धाडसत्र सुरु ठेवणार असल्याचे विलास पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले आहे.

Protected Content