तिन्ही मंत्र्यांची सरकार दरबारी किंमत राहिलेली नाही : नाथाभाऊंचा पलटवार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आधी कंत्राटदारांची ३०० कोटी रूपयांची देयके आणि आणि नंतरच माझ्यावर आरोप करा असे सांगत आमदार एकनाथराव खडसे यांनी तिन्ही मंत्र्यांची सरकार दरबारी किंमत राहिलेली नसल्याचा जोरदार पलटवार केला आहे.

काल जिल्हा नियोजन मंडळाची बैठक ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील व ना. अनिल पाटील या तिन्ही मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन मंडळाच्या सभागृहात पार पडली. या बैठकीचा पूर्ण फोकस हा याप्रसंगी अनुपस्थित असलेले आमदार एकनाथराव खडसे यांच्यावरच होता. खडसे यांनी विधीमंडळ अधिवेशनात सार्वजनीक बांधकाम खात्याबाबत लक्षवेधी उपस्थित केल्यामुळे जिल्ह्यातील सुमारे एक हजार कोटी रूपयांची कामे रखडल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाण यांनी केला. आमदार किशोरआप्पा पाटील यांनी याला दुजोरा दिला. खडसे हे अधिकार्‍यांना ब्लॅकमेल करत असून त्यांच्यामुळेच एक हजार कोटींचा निधी आणि त्यातून होणारी रस्त्यांची कामे थांबल्याचा आरोप देखील मंगेश चव्हाण यांनी केला.

आमदार खडसे यांच्या दबावतंत्रावरून उपस्थित आमदार आणि मंत्र्यांनी मोठे मंथन केले. यावरून आमदार खडसे यांचा निषेधाचा प्रस्ताव देखील याप्रसंगी मांडण्यात आला. जिल्हा नियोजन मंडळाची बैठक घेतल्यानंतर ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन आणि पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी याच मुद्यावरून आमदार एकनाथराव खडसे यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. वास्तविक पाहता हे सर्व आरोप एकनाथ खडसे यांच्या अनुपस्थितीत झाले असल्याने त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी लाईव्ह ट्रेंडस न्यूजने संपर्क साधला असता ते मुंबईत असल्याची माहिती मिळाली.

दरम्यान, आमदार एकनाथराव खडसे यांनी मुंबई येथे टिव्ही नाईन या मराठी वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत देऊन आरोप फेटाळून लावत सत्ताधार्‍यांवर प्रत्यारोप केले. याप्रसंगी एकनाथ खडसे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात प्रशांत सोनवणे हे १५ वर्षांपासून असल्याने आपण विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थिती केली. यावर मंत्र्यांनी कार्यवाहीचे आदेश देऊन देखील काहीही झाले नाही. या अधिकार्‍याला सत्ताधार्‍यांनी पाठीशी घातले. आणि यानंतर आता हीच मंडळी आपल्यावर आरोप करत असल्याचे नाथाभाऊ म्हणाले.

आमदार एकनाथराव खडसे पुढे म्हणाले की, सत्ताधारी मंत्री आणि आमदार हे माझ्यावर एक हजार कोटींच्या कामांना ब्रेक लावण्याचा आरोप करत असले तरी त्यांनी आधी कंत्राटदारांचे तीनशे कोटी रूपये आणून दाखवावेत. सार्वजनीक बांधकाम खात्याच्या ठेकेदारांची ३०० कोटींची बिले थकीत असून ही देयके मिळण्यासाठी त्यांनी आंदोलन केले होते. जर सत्ताधार्‍यांमध्ये दम असेल तर त्यांनी आधी हे ३०० कोटी आणावेत मगच आपल्यावर आरोप करावेत असे प्रति-आव्हान एकनाथराव खडसे यांनी केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदी हे ना खाऊंगा, ना खाने दुंगा असे म्हणत असतांना त्यांच्याच पक्षाचे लोक भ्रष्टाचाराला पाठीशी का घालत आहेत ? असा प्रश्‍न देखील एकनाथराव खडसे यांनी उपस्थित केला आहे. काहीही झाले तरी गैरकामे आपण होऊ देणार नाहीत. सरकार तुमचेच आहे. तुमची पत असेल तर आधी ठेकेदारांचे ३०० कोटी रूपये द्या असे आव्हान त्यांनी जिल्ह्यातील तिन्ही मंत्री आणि आमदारांना दिले आहे. तर तिन्ही मंत्र्यांची शासन दरबारी काहीही किंमत नसल्याचा टोला देखील त्यांनी मारला आहे.

व्हिडीओत पहा : ना. गिरीश महाजनांनी नाथाभाऊंवर केलेली जोरदार टिका

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/292508736704403

Protected Content