मोबाईल दुकान फोडणाऱ्या दोन गुन्हेगारांना अटक; एमआयडीसी पोलीसांनी कामगिरी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी येथील तरूणाची मोबाईलचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी तीन मोबाईलसह रोकड आणि मोबाईलच्या वस्तू चोरून नेल्याची घटना उघडकीला आली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी अटक केली आहे.

सविस्तर माहिती अशी की, सुभाष सुरेशचंद जैन (वय-३८) रा. सुप्रिम कॉलनी हे कुटुंबियांसह राहतात. ते मोबाईल विक्रीचा व्यवसाय करतात. यासाठी जळगाव औरंगाबाद महामार्गावरील आर.एल. चौफुलीवर पार्टीशन पत्र्याचे मोबाईल दुकान आहे. २७ सप्टेंबर रोजी रात्री १० ते २८ सप्टेंबर २०२१ दरम्यान सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मोबाईलचे बंद दुकान फोडून दुकानातील तीन मोबाईल, २ हजाराची रोकड आणि मोबाईल असेसरीज असा एकुण ८ हजार ५०० रूपयांची मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी सुभाष जैन यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी गुन्ह्यातील तपास लावण्याचे निर्देश दिले. या गुन्ह्यातील एमआयडीसी पोलीसांनी संशयित आरोपी शुभम उर्फ बांडु शिवरात मिस्तरी (वय-२०) रा. वाल्मिक मंदीराजवळ जैनाबाद आणि राहूल रविंद्र कोळी (वय-१९) रा. जैनाबाद यांना सोमवारी २५ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता अटक केली. यातील शुभमकडून दीड हजार रूपये किंमतीचा चोरीचा मोबाईल हस्तगत केला असून चोरी केल्याची कबुली दिली आहे. यातील संशयित आरोपी (पुर्ण नाव माहिती नाही) या तिघांनी मिळून चोरी केल्याचे कबुल केले आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, सचिन पाटील, मुकेश पाटील यांनी कारवाई केली. दोन्ही संशयित आरोपींना आज न्यायमूर्ती शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  सरकारतर्फे ॲड.स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले. दोन्ही गुन्हेगारांकडून एमआयडीसीतील बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या दोन्ही संशयितांवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चोरीचे प्रत्येकी तीन तीन गुन्हे दाखल आहे.

Protected Content