शिवसेना नसती तर प्राणप्रतिष्ठा झाली नसती – संजय राऊत

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | शिवसेना ठाकरे गटाचं नाशिकमध्ये राज्यव्यापी महाधिवेशन होत आहे. नाशिकच्या सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी महाधिवेशन पार पडतंय. या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत बोलत आहेत. शिवसेना नसती, तर अयोध्येत प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठाच झाली नसती, असं यावेळी संजय राऊत म्हणाले. संपूर्ण देशातील वातावरण राममय झालं आहे. त्यात उध्दव ठाकरे यांनी ज्योत पेटवली आहे. श्रीरामासोबत शिवसेनेचं जुनं नातं आहे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झालीच नसती. शिवसेनेचे वाघ तिकडे पोहोचले. म्हणून काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिकडे जाऊन प्राण प्रतिष्ठापना करता आली. लोक म्हणतात, रामाशी आमचं नातं नाही. जिथे हे अधिवेशन होत आहे ते धर्मक्षेत्र आहे. कुरुक्षेत्र आहे, कारण इथून आपण लढाई सुरू केली होती. आम्ही काय कुणाचे खातो, जे आम्हाला देतो. हे धर्मक्षेत्र आहे….लढाई आपण कुरुक्षेत्रातून सुरू करणार आहोत, असं संजय राऊत यांनी या महाअधिवेशनात म्हणाले.

जो राम अयोध्येतला आहे, तोच राम पंचवटीतील आहे. उद्धव ठाकरे यांनी नाशिकची निवड केली त्याला फार महत्व आहे. रामाचे धैर्य आहे ते शिवसेनेचे धैर्य आहे. रामाचा जो संयम आहे तो उद्धव ठाकरे यांचा संयम आहे. धैर्य आमच्याकडे नसतं तर शिवसैनिकांनी बाबरी पाडली नसती. भाजपकडे धैर्य नाही. बाबरी कोसळली तसं त्यांचं धैर्य कोसळलं आणि आम्ही केलं हे नाही असं सांगितलं. दिल्लीतील रावणशाहीसमोर आम्ही झुकणार नाही, असंही राऊत म्हणाले.

नाशिकमध्ये ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनाला ठाकरे गटाचे सर्व खासदार आणि आमदार उपस्थित आहेत.उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह ठाकरे गटाचे इतरही नेते मंचावर उपस्थित आहे. या अधिवेशनात सध्या संजय राऊत बोलत आहेत. अधिवेशनानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेकडे राज्याचं लक्ष आहे.

Protected Content