इंग्रज भारतात आले नसते तर देशावर मराठ्यांचे राज्य असते : शशी थरूर

gmi8p09g shashi tharoor jaipur literature festival pti 625x300 28 January 19

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) व्यापारी म्हणून इंग्रज भारतात आलेच नसते तर देशावर मराठ्यांचे राज्य असते, असे मत सुप्रसिद्ध लेखक आणि काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी व्यक्त केले आहे. त्यांचा या संदर्भातील भाषणाचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.

 

MBIFL 19 या फेस्टिव्हलमध्ये व्याख्यान देण्यासाठी शशी थरुर यांना बोलावण्यात आले होते. यावेळी एका विद्यार्थिनीने थरूर यांना प्रश्न विचारला की, व्यापारी म्हणून इंग्रज भारतात आलेच नसते तर काय घडले असते? त्यावर शशी थरुर यांनी हे उत्तर दिले की, अहमद शाह अब्दाली याने पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव केला. हा पराभव मराठ्यांसाठी धक्कादायक म्हणावा असा पराभव होता. अहमद शाह अब्दालीला भारतावर राज्य करायचे नव्हतं. त्यामुळे तो आला त्याने लढाई केली, या ठिकाणी असेला खजिना लुटला, मौल्यवान हिरे, जवाहिर लुटून नेले आणि तो अफगाणिस्तानला परतला. मात्र समजा हा पराभव झाला नसता आणि देशात इंग्रज आलेच नसते तर या देशावर म्हणजेच भारताव मराठ्यांनी राज्य केले असते असे शशी थरुर यांनी म्हटले.

 

थरूर पुढे सांगतात की, संभाजी महाराजांना सांभार खावसे वाटत होते म्हणून ते खास त्यांच्यासाठी तयार करण्यात आलं. त्यानंतर हा पदार्थ दक्षिणेत आला त्यामध्ये स्थानिक मसाले, चिंच यांचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे सांबार ही मराठ्यांनी दिलेली देणगी आहे. संभाजी महाराजांना ते आवडत असे त्यामुळे त्याचे नाव सांभार असे पडले होते, असेही शशी थरुर यांनी म्हटले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनीही महाराष्ट्रात त्यांचा दबदबा निर्माण केला होता. त्यांच्यानंतरही पेशव्यांनी अटकेपार झेंडे लावले हे आपल्याला इतिहासावरुन ठाऊक आहेच. त्याचमुळे जर इंग्रज भारतात आले नसते तर मराठ्यांनीच देशावर राज्य केले असते असे शशी थरुर यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केला आहे.

Protected Content